मध्यरात्री पोलिसांचा मोठा छापा; अमृता लॉजमधील अवैध धंदा उघड, दोघांना अटक
बारामती, दि. १५ : बारामती-भिगवण रोडवरील वंजारवाडी परिसरातील अमृता लॉज (सोमनाथ हॉटेल) येथे सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायावर बारामती तालुका पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून पाच महिलांची सुटका करण्यात आली आहे.
१४ एप्रिल २०२६ रोजी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक रामहरी भोसले यांच्या पथकाने बोगस ग्राहकाच्या मदतीने सापळा रचत पंचांच्या उपस्थितीत अमृता लॉजवर छापा टाकला.
छाप्यादरम्यान लॉजमधील विविध खोल्यांची तपासणी करण्यात आली असता काही ठिकाणी महिला व ग्राहक एकत्र आढळले. चौकशीदरम्यान संबंधित आरोपी बाहेरून महिलांना आणून त्यांच्याकडून देहव्यवसाय करून घेत असल्याचे निष्पन्न झाले. ग्राहकांकडून पैसे घेऊन त्यातून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेत असल्याचेही उघड झाले.
या प्रकरणात अजित जयसीन शेट्टी (वय ३८, हॉटेल चालक) व चाँद कलाम आलम (वय २०) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच पश्चिम बंगाल येथील ३ आणि भिवंडी, मुंबई येथील २ अशा एकूण ५ महिलांची सुटका करून त्यांना सुधारगृहात ठेवण्यात आले आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी बोगस ग्राहकाला दिलेल्या नोटांसह रोख रक्कम, मोबाईल फोन, कंडोम पाकिटे तसेच ग्राहकांची नोंद असलेले रजिस्टर असा सुमारे १७,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात भा. न्याय संहिता कलम १४३(३), ३(५) तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा १९५६ च्या कलम ४ व ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक रामहरी भोसले, पोलीस अंमलदार संतोष कांबळे, केदारनाथ बिडवे, नितीन ढवाण, राजू बनणे, निलेश वाकळे, विठ्ठल तरंगे, स्मिता गायकवाड यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.





