अजितदादा पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कार्यकर्त्यांना संयमाचे आवाहन
बारामती | प्रतिनिधी
लोकनेते, माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण बारामती तालुका व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने राजकीय, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व उमेदवारांना संयम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पक्षशिस्त, सामाजिक जबाबदारी आणि भावनिक संवेदनशीलता जपणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
येत्या निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर विजय मिळाल्यास मिरवणूक, जल्लोष, फटाके, डीजे, घोषणाबाजी किंवा कोणत्याही प्रकारचा आनंदोत्सव साजरा करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. विजय घोषित झाल्यानंतर सर्वांनी प्रथम विद्या प्रतिष्ठान, बारामती येथे आदरणीय अजितदादा पवार यांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक होऊन हा विजय त्यांना समर्पित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हा विजय आनंद व्यक्त करण्यासाठी नसून, आदरणीय दादांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा आणि त्यांनी पाहिलेली स्वप्ने साकार करण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प म्हणून घ्यावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
ही माहिती श्री. संदीप बांदल, अध्यक्ष – बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी दिली आहे.




