बारामती झाली शांत …
एक माणूस, आणि एक बारामती .. त्याचे नाव अजित दादा पवार…!
दादा…
तो जन्माला आला तेव्हा कुणाला माहीत नव्हतं
की हा मुलगा मोठा होऊन सावली देईल.
पण बारामतीच्या मातीत काहीतरी वेगळंच होतं—
ती माती माणसं घडवते, आणि क्वचित कधी
दादा घडवते.
बालपण साधं होतं.
पायात साधी चप्पल, अंगात स्वाभिमान. बालपणीच
तो लोकांकडे पाहायचा—
त्यांच्या प्रश्नांत स्वतःला शोधायचा.
इतर मुलं स्वप्नं पाहायची,
हा मुलगा जबाबदारी पाहायचा.
काकांची साथ मिळाली.
ती फक्त हात धरून चालवणारी नव्हती,
ती मन घडवणारी होती.
“डरू नकोस, पण उथळही होऊ नकोस”
हे त्याला लवकरच कळलं.
राजकारणात उतरताना
तो आवाज वाढवून बोलला नाही
त्याने काम बोलू दिलं.
बहिणींसाठी तो दादा होता…
नावापुरता नाही,
तर प्रत्येक अडचणीत पुढे उभा राहणारा.
त्याच्या रागातही काळजी होती,
आणि शांतपणातही निर्णय.
लग्न झालं.
पत्नीने नेत्याला नवरा म्हणून स्वीकारलं.
घरात तो कमी असायचा,
पण जेव्हा असायचा
तेव्हा पूर्ण असायचा.
थकलेला चेहरा,
पण मन अजूनही लोकांमध्येच.
मुलावर त्याचं प्रेम बोलकं नव्हत…
ते शांत होतं,
खोल होतं.
“मी नसेन तरी तू माणूस म्हणून उभा राहशील”
अशी त्याची नजर होती.
हळूहळू तो दादा झाला.
लोक त्याच्याकडे प्रश्न घेऊन येऊ लागले.
तो प्रत्येकाला उत्तर देऊ शकत नव्हता,
पण तो प्रत्येकाला ऐकायचा.
आणि कधी “नाही” म्हणाला
की लोकांना कळायचं—
इथे कारण आहे.
तो धाक होता,
पण भीती नव्हती.
तो दरारा होता,
पण दुरावा नव्हता.
तो माणसं मोठी करायचा,
स्वतः मोठा दिसण्यासाठी नाही.
चूक झाली तर
तो मागेही यायचा.
दोन पावलं मागे,
पण उडी नेहमी मोठी.
राखेतून उडायचं त्याना जमायचं,
म्हणूनच तो गरुड होता.
बारामतीसाठी श्वास होता.
“दादा आहेत”
हे वाक्य पुरेसं होतं.
ते आश्वासन होतं,
ते धैर्य होतं.
मग एक दिवस…
वेळेने चूक केली.
काळाने घाई केली.
आकाश शांत होतं,
पण जमीन थरथरत होती.
बारामती रडली.
पहिल्यांदा —
ढसाढसा रडली.
हा अंत्यविधी नव्हता,
तो आपल्या माणसाला दिलेला निरोप होता.
आजही तो जाताना दिसत नाही.
कारण दादा माणूस होता,
खुर्ची नव्हे.
तो आहे—
आईच्या हुंदक्यात,
बहिणीच्या आठवणीत,
पत्नीच्या शांत डोळ्यांत,
मुलाच्या भविष्यात…
आणि
प्रत्येक बारामतीकराच्या छातीत
धडधडणाऱ्या आत्मविश्वासात.
तो कुठे गेला?
तो इथेच आहे.दादा कधी जात नाही—
दादा कधीच संपत नाहीत…. आम्हा बारामतीकरांना सोडून… कारण की त्यांना तो आत्मविश्वास बारामतीकर आहेत त्यांच्या सदैव पाठीशी…




