बारामतीत पत्रकार दिनाचा ऐतिहासिक ‘मानबिंदू’ सोहळा विविध सन्मानांतून जागृत झालेला पत्रकारांचा आत्मसन्मान…!

0
7

संपादक संतोष शिंदे बारामती . 982273018

विविध सन्मानांतून जागृत झालेला पत्रकारांचा आत्मसन्मान

बारामतीत पत्रकार दिनाचा ऐतिहासिक ‘मानबिंदू’ सोहळा

बारामती | दि. ६
मराठी पत्रकारितेचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा पत्रकार दिन यंदा बारामती शहर व तालुक्यासाठी केवळ औपचारिक दिन न राहता, पत्रकारांच्या आत्मसन्मानाचा, स्वाभिमानाचा आणि जबाबदारीची जाणीव करून देणारा ऐतिहासिक दिवस ठरला. विविध शासकीय कार्यालये, सहकारी संस्था, राजकीय व सामाजिक संघटनांच्या माध्यमातून झालेल्या सन्मानामुळे बारामतीतील पत्रकार दिनाला ‘मानबिंदू’चे स्वरूप प्राप्त झाले.

लोकशाहीतील चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांची भूमिका अधोरेखित करत उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या वतीने नवीन प्रशासकीय भवनातील उप माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार प्रतिभा शिंदे, नामदेव काळे, स्वाती गायकवाड, पुरवठा निरीक्षण अधिकारी तितिक्षा बारापात्रे तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार हे समाजाचे आरसे असून सत्य मांडण्याची जबाबदारी ते निष्ठेने पार पाडत असल्याचे गौरवोद्गार यावेळी व्यक्त झाले.

दरम्यान, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वसंतदादा पवार सभागृहात पार पडलेला भव्य पत्रकार सन्मान सोहळा हा या दिनाचा केंद्रबिंदू ठरला. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा संजय गांधी निराधार योजना बारामती तालुका माजी अध्यक्ष संभाजी (नाना) नारायण होळकर यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाने पत्रकारांच्या योगदानाला सार्वजनिक व्यासपीठावर मान्यता दिली.

या सोहळ्यास नगराध्यक्ष सचिन सातव, प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार स्वप्निल रावडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन विश्वास आटोळे, दूध संघाचे चेअरमन संजय कोकरे, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन कैलास गावडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि प्रिंट, टीव्ही व डिजिटल मीडियातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा कार्यकर्ते विशाल भाऊ जाधव यांच्या वतीनेही पत्रकार व संपादकांचा सन्मान करण्यात आला. टोपी, शाल, श्रीफळ, भोजन व्यवस्था, तसेच विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आलेला सन्मान पत्रकारांसाठी सन्मानासोबतच आपुलकीचा भाव घेऊन जाणारा ठरला. तसेच पी.डी.सी. बँक, बारामती येथेही ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान सोहळा पार पडला.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, बारामती नगरपरिषदेच्या वतीने यंदा प्रथमच स्थानिक पत्रकार व संपादकांचा अधिकृत सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. नगरपरिषदेच्या इतिहासातील हा पहिलाच उपक्रम पत्रकारांसाठी समाधान व अभिमानाची बाब ठरला. यावेळी पत्रकार भवन, पत्रकारांसाठी सदनिका व घरकुल योजना यांसारख्या मागण्यांवर नगराध्यक्ष सचिन सातव यांनी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सकारात्मक प्रयत्नांचे आश्वासन दिले.

पोस्ट ऑफिस, शहर पोलीस स्टेशन व ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या वतीनेही पत्रकार दिनानिमित्त सन्मान कार्यक्रम पार पडले. एकूणच शहरातील प्रत्येक यंत्रणेकडून पत्रकारांच्या कार्याची दखल घेण्यात आल्याचे चित्र दिसून आले.

हा सन्मान केवळ पुष्पगुच्छ, शाल किंवा ट्रॉफी पेन पुरता मर्यादित नव्हता, तर पत्रकारांनी आपल्या कार्यातील जबाबदाऱ्या अधिक आत्मपरीक्षणाने स्वीकाराव्यात, अशी सूचक जाणीव करून देणारा होता. “काय मिळाले?” यापेक्षा “आपल्या कार्याची दखल घेतली गेली” ही भावना पत्रकारांच्या मनात मानसिक समाधान देऊन गेली.

इतिहासात प्रथमच इतक्या व्यापक प्रमाणावर झालेला हा पत्रकार सन्मान सोहळा बारामतीसाठी मैलाचा दगड ठरला आहे. पुढील काळातही पत्रकार आणि प्रशासन यांच्यातील हा सन्मानाचा, विश्वासाचा पूल अधिक भक्कम व्हावा, हीच या दिनानिमित्त व्यक्त झालेली सामूहिक अपेक्षा म्हणावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here