जय जय महाराष्ट्र माझा…

0
222

जय जय महाराष्ट्र माझा…

दिल मे आखो मे
देशभक्ती की चमक रखता हूँ,
दुश्मन की जान निकल जाये
आवाज मे इतनी दमक रखता हूँ।
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’, (यातील दोन कडव्याचे) हे गीत महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत म्हणून स्वीकारले जात आहे. याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आहे. १९६० साली महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर ६१ वर्षात शासनामार्फत राज्यगीत तयार करण्यात आलेले नव्हते, किंवा कोणत्याही गीतास राज्यगीताचा दर्जा देण्यात आलेला नाही. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. कविवर्य राजा बढे यांनी हे गीत लिहिले असून ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’, या गीतामधील १ मिनिट ४१ सेकंदाच्या दोन कडव्यांना राज्यगीत म्हणून स्वीकारण्यात येत आहे.
वास्तविक या स्फुर्तीगीताला आता राज्यगीताचा दर्जा मिळाला असला तरी सदर गीताचे लिखाण झाल्यानंतर व शाहीर म्हणून पहिले पद्मश्री प्राप्त कृष्णराव गणपतराव साबळे (जन्म ३-९-१९२३; मृत्यू २०-३-२०१५) यांनी गायल्यानंतर राज्यातील महाराष्ट्रप्रेमी जनतेने डोक्यावर घेतलेले हे गीत आहे. शाहीर साबळेंच्या पहाडी आवाजात आणि श्रीनिवास खळे यांच्या संगीताने हे गीत वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. या वीररसपूर्ण ओजस्वी गीताचे सादरीकरण राज्यात हजारो कार्यक्रमात अनेकांकडून झाले आहे. अलीकडच्या काळात स्वरविहार औरंगाबादचे सर्वेसर्वा संगीत शास्त्राचे प्रा. राजेश सरकटे सर यांनी त्यांच्या सुमारे ५००० पैकी ३००० कार्यक्रमात आपल्या पहाडी आवाजात ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’, हे गीत जबरदस्त पद्धतीने सादरीकरण केल्याची नोंद आहे. राज्याचे जाणते नेते मा. शरदचंद्र पवार साहेब यांची तर या गीताची खास फर्माईश असते व दादही देतात, हे हजारो रसिकांनी अनुभवले आहे. त्याच्या पूर्वी म्हटले तर बुलढाण्याचे शाहीर राजपूत परिवारानेही प्रत्येक कार्यक्रमाच्या सुरुवातीला हे गीत गायिले आहे. स्वर्गीय शाहीर बाबूसिंग राजपूत यांनी सर्वप्रथम १९७४ साली मातृतीर्थ सिंदखेडराजा (राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ) येथे महाराष्ट्रगीत म्हणून हे गीत सादर केल्याची नोंद आहे.
एकूणच राज्यगीत म्हणून कायदेशीर मान्यता नसतानाही लोकांनी उत्स्फूर्तपणे डोक्यावर घेतलेले व लोकाश्रय मिळालेले हे गीत आता खर्‍या अर्थाने राज्यगीत म्हणून शिक्कामोर्तब केल्या जात असल्याचा जनतेला आनंद आहे.
राज्यात अशी लोकप्रियता श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या ‘बहु असो सुंदर संपन्न की महा, प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा’, या स्फूर्तीगीताला लाभली आहे. तसेच मराठी अभिमानगीत म्हणून अनेक कार्यक्रमात कविवर्य सुरेश भट लिखित व कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेले ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी’, हे गीतही सादर केले जाते. ही दोन्ही गीतेही राज्याच्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात वेळोवेळी सादर केली जातात.
‘जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’, या गीतात भरपूर वीररस आहे, तर महाराष्ट्राचा इतिहास, वैभव, शूरता, संस्कृती दाखवत यथोचित वर्णन आहे. हे गीत अंगात रोमांच निर्माण करते. राज्यअभिमान, स्वाभिमान, जागृत करते. तसेच महाराष्ट्र प्रतीचे प्रखर प्रेम दर्शवते. त्यामुळेच राज्यगीताच्या या निर्णयाचे स्वागत झाले, आणि ‘जे जनतेच्या मनात, तेच शासनाच्या या धोरणात’, असे झाले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीदिन येत्या १९ फेब्रुवारी २०२३ नंतर ‘जय जय महाराष्ट्र माझा’, या गीताला कोठे? केव्हा? कसे? सादर करावे, त्याचा मान कसा राखल्या जावा, याचे निर्देश जाहीर झाले आहेत. सोबतच राष्ट्रगीत आणि राज्यगीतमध्ये राष्ट्रगीताचे स्थान प्रथम कायम राहील, असे म्हटले आहे. राज्यगीत उभे राहून म्हणावे, तर लहान बालके, गरोदर महिला, आजारी व्यक्ती, दिव्यांग, वृद्धांना उभे राहण्यातून सूट राहील, असेही नमूद केले आहे. प्रामुख्याने शाळांमध्ये राष्ट्रगीत, परिपाठ, प्रार्थनेमध्ये राज्यगीताचाही समावेश केला जाणार आहे.
एकूणच महाराष्ट्रात राहणारा हा महाराष्ट्रीयन हे सूत्र वापरून प्रत्येकाने ‘जय जय महाराष्ट्र माझा’, या राज्यगीताचा सन्मान करणे व मिरविणे अपेक्षित आहे.
शेवटी अभिमानपर काही ओळी आठवतात….
माझा माझा महाराष्ट्र माझा,
मनोमनी वसला शिवाजी राजा,
वंदितो या भगव्या ध्वजा,
गर्जतो गर्जतो महाराष्ट्र माझा,
गर्जा महाराष्ट्र माझा….

       राजेश राजोरे
              

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here