बारामती, प्रतिनिधी:
शिर्सूफळ येथे नवीन शेळी-मेंढी बाजाराचा शुभारंभ – पशुपालकांना नवी बाजारपेठ
शिर्सुफळ गावचे सरपंच व ग्रामस्थांनी मागणी केल्यामुळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शिर्सूफळ (ता. बारामती, जि. पुणे) येथे नव्याने शेळी-मेंढी बाजार सुरू करण्यात येत आहे. या बाजाराचा शुभारंभ बारामती बाजार समितीचे सभापती विश्वासराव आटोळे यांचे हस्ते शुक्रवार, २८ मार्च २०२५ रोजी सकाळी ८.०० वाजता होणार असुन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. जुईताई हिवरकर तर प्रमुख उपस्थितांमध्ये आप्पासो आटोळे सदस्य, जिल्हा परिषद, पुणे, सौ. हिराबाई झगडे ,उपसरपंच ग्रामपंचायत शिर्सूफळ, शिवाजी झगडे, माजी चेअरमन, बारामती तालुका दूध संघ आणि अनिल हिवरकर, माजी सभापती बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती उपस्थित असणार आहेत.
बारामती तालुक्यातील व इतर परिसरातील शेळीपालन व मेंढीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ मिळावी म्हणून हा बाजार सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे मध्यस्थ कमी होऊन विक्रेत्यांना थेट खरेदीदारांशी संपर्क साधता येणार आहे, परिणामी चांगला दर मिळण्याची संधी निर्माण होणार असल्याची माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली.
पशुपालक आणि व्यापारी, ग्रामस्थ यांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती व ग्रामपंचायत शिर्सूफळ यांनी केले आहे. कार्यक्रमाचे आयोजन शिर्सूफळ बाजारतळ, ता. बारामती येथे करण्यात आले असून, शेळीपालक व मेंढीपालकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.



