कलापथक प्रमुखांनी 25 फेब्रुवारीला सादरीकरणास उपस्थित राहण्याचे आवाहन
पुणे, दि. 13: लोककला, पथनाट्याद्वारे शासनाच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिद्धी करावयाची आहे. त्यासाठी पुणे जिल्हयातील कलापथक /पथनाट्य संस्थांकडून कार्यक्रम मिळणेबाबत अर्ज मागविण्यात येत आहेत. मागणी अर्जामध्ये एका कार्यक्रमाचे सर्व खर्चासह एकूण मानधनाचा उल्लेख करणे आवश्यक आहे.
संस्थांनी इतर विभागांच्या योजनांची प्रसिद्धी केलेल्या कार्यक्रमाची 3 ते 5 मिनिटांची ऑडिओ, व्हिडीओ क्लिप पेनड्राईव्हमध्ये सोबत आणणे आवश्यक आहे. प्रत्येक कार्यक्रमासाठी कलापथक/ पथनाट्य ग्रुपमध्ये स्त्री-पुरुष, गायक-वादक यांच्यासह एकूण 10 कलावंत असणे आवश्यक आहे. कार्यक्रमासाठी वाहन व्यवस्था, ध्वनीक्षेपण यंत्रणा, संगीत साहित्य, बॅनर, कलाकारांना अल्पोपहार, भोजन इत्यादी पुरविण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची राहील.
सादरीकरणाद्वारे संस्थांची निवड करण्याकरीता दि. 25 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळ मजला, ससून रुग्णालयासमोरील दगडी बिल्डींग (सेंट्रल बिल्डींग) पुणे स्टेशन, पुणे 411001 येथे स्वखर्चाने उपस्थित रहावे, असे आवाहन पुणे जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
