औद्योगिक ग्राहकांचे वीजपुरवठ्या बाबतचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार- मुख्य अभियंता धर्मराज पेठकर

0
22

औद्योगिक ग्राहकांचे वीजपुरवठ्या बाबतचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार- मुख्य अभियंता धर्मराज पेठकर

बारामती एमआयडीसी, पणदरे एमआयडीसी, बारामती सहकारी औद्योगिक वसाहतीसह परिसरातील औद्योगिक ग्राहकांचे वीज पुरवठ्यासंबंधी प्रश्न सोडणवण्यासाठी आपण प्राधान्य देऊ अशी ग्वाही महावितरण बारामती परिमंडळाचे नवनियुक्त मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांनी दिली. मुख्य अभियंता पदाचा कार्यभार पेठकर यांनी नुकताच स्विकारल्यानंतर बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, सचिव अनंत अवचट, सदस्य महादेव गायकवाड, संभाजी माने व हरिश्चंद्र खाडे यांनी सदिच्छा भेट घेतली त्यावेळी पेठकर बोलत होते.

धनंजय जामदार म्हणाले बारामती एमआयडीसीतील ट्रान्सफॉर्मर पंधरा ते वीस वर्षापूर्वी बसवलेले असून त्यातील बहुसंख्येने ओव्हरलोड झाले आहेत. त्यामुळे उद्योगांनी नवीन अथवा वाढीव वीजपुरवठा मागितला तर लोड शिल्लक नसलेचे सांगितले जाते व यामुळे उद्योग वाढीवर विपरीत परिणाम होत आहे तसेच महावितरणचा महसूल देखील बुडत आहे. यासाठी महावितरणने संपूर्ण औद्योगिक क्षेत्रातील सर्व ट्रान्सफॉर्मर्सचे सर्वेक्षण करावे व उद्योगांची वाढीव वीज पुरवठ्या बाबतची मागणी विचारात घेऊन महावितरणच्या खर्चाने आवश्यक तेथे मोठ्या क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर्स बसवणे आवश्यक आहे. पणदारे एमआयडीसी मधील उद्योगांच्या वीज पुरवठाबाबत प्रदीर्घ काळापासून अनेक तक्रारी असून त्यासाठी ढाकाळे येथील मंजूर वीज उपकेंद्र तातडीने कार्यान्वित करावे व पणदरे मधील उद्योजकांना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी अध्यक्ष धनंजय जामदार यांनी यावेळी केली.

बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी वीज पुरवठा विषयी उपस्थित केलेले प्रश्न महत्वाचे असून आपण त्याचा आढावा घेऊन समस्या सोडवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांनी बिडा असोसिएशनच्या शिष्टमंडळाला यावेळी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here