श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना गळीत हंगाम २०२४-२५ शुभारंभ….

0
18

भवानीनगर: श्री छत्रपति सहकारी साखर कारखाना सन २०२४-२५ हंगामाचा शुभारंभ

भवानीनगर येथील श्री छत्रपति सहकारी साखर कारखान्याच्या २०२४-२५ गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कारखान्याचे वर्क्स मॅनेजर श्री. विकास क्षीरसागर व त्यांच्या पत्नी सौ. पुनम क्षीरसागर तसेच फायनान्स मॅनेजर श्री. हनुमंत करवर व त्यांची पत्नी सौ. स्वाती करवर यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले. कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी श्री. जालिंदर शिंदे यांच्या हस्ते काटापूजन करण्यात आले. या प्रसंगी कार्यकारी संचालक श्री. अशोक जाधव व इतर अधिकारी व कर्मचारी यांच्या हस्ते गव्हाण पुजन करण्यात आले.

कार्यकारी संचालक श्री. अशोक जाधव यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगितले की, यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रात २१,४८१ एकर ऊस उपलब्ध आहे, ज्यातून ८,००,००० मे. टन ऊस गाळप करण्याची तयारी करण्यात आली आहे. याशिवाय कार्यक्षेत्राबाहेरील सुमारे ३,००,००० मे. टन गेटकेन ऊसाचीही अपेक्षा आहे. यंदा कारखान्याचे एकूण गाळप उद्दिष्ट ११,००,००० मे. टन ठरविण्यात आले आहे, जे पूर्ण करण्यासाठी दररोज ९,५०० ते १०,००० मे. टन ऊसाचा पुरवठा करण्याचे नियोजन आहे. सध्या ऊस कमी उपलब्ध असले तरी सभासदांनी आपला ऊस गाळपासाठी कारखान्याला देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कारखान्याचे अध्यक्ष श्री. प्रशांत काटे यांनी सांगितले की, कार्यक्षेत्रात ८६०३२ आणि उच्च साखर उतारा देणाऱ्या इतर ऊस जातींची लागवड वाढविण्याचे प्रयत्न गेल्या चार वर्षांपासून सुरू आहेत. या व्हरायटीचे क्षेत्र वाढल्याने कारखान्याच्या साखर उत्पादनात नक्कीच वाढ होईल, ज्यामुळे आर्थिक अडचणींवर मात करण्यास मदत होईल. सभासद, बिगर सभासद, अधिकारी, कर्मचारी, ऊस तोडणी मजूर आणि कंत्राटदार यांचे सहकार्य अपेक्षित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमात माजी संचालक श्री. भाऊसाहेब सपकळ, श्री. तानाजीराव थोरात, श्री. विशाल निंबाळकर, श्री. अमरसिंह कदम आणि श्री. प्रशांत पवार यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. युवराज रणवरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. अमोल पाटील यांनी केले. कार्यक्रमाला संचालक मंडळातील श्री. बाळासाहेब पाटील, श्री. दत्तात्रय सपकळ, श्री. राजेंद्र गावडे, श्री. संतोष ढवाण, श्री. सर्जेराव जामदार, श्री. नारायण कोळेकर, तसेच अन्य मान्यवर, सभासद आणि अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here