ग्रामीण भागात जिल्हा परिषदेकडून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ला गती

0
55

ग्रामीण भागात जिल्हा परिषदेकडून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ला गती

पुणे, दि. १४: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची शासनाच्या मार्गदर्शक सूचना व निर्देशानुसार पुणे जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेमध्ये सध्या ऑफलाइन पद्धतीने मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त झालेले आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिली आहे.

शासनाच्या निर्देशानुसार योजनेच्या अनुषंगाने गाव पातळीवर समित्या गठित करण्यात आलेल्या असून शासकीय कार्यरत यंत्रणांची प्रत्येक गाव, वॉर्ड स्तरावर बैठका घेवून नियोजन करण्यात आलेले आहे. सर्व अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. मोहीम स्वरूपात योजनेच्या अंमलबजावणीसाठी कॅम्पचे आयोजन करण्याबाबत सरपंच, नगरसेवकांना आवाहन करण्यात आलेले आहे.

गावातील अथवा त्या त्या वार्ड मधील सर्व पात्र लाभार्थ्यांचे ऑफलाइन पद्धतीने हार्ड कॉपी अर्ज अंगणवाडी सेविकांकडे जमा करण्यात येत आहेत. अर्जांची नोंद अंगणवाडी स्तरावर घेण्यात येत असून त्याबाबतच्या नोंदी नोंदवहीत ठेवण्यात येत आहेत.

प्रत्येक शनिवारी सर्व नोंद झालेल्या लाभार्थ्यांच्या नावांचे चावडी वाचन करून आक्षेप असल्यास पात्र, अपात्रतेबाबत गाव पातळीवरच खातरजमा करून तालुकास्तरावर समितीने अंतिम मान्यता देण्यात बाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे.

गावातील प्राप्त झालेल्या सर्व ऑफलाईन अर्जाचे ऑनलाइन स्वरूपात अर्ज भरण्याकरिता गावातील ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, सीआरपी बचत गट तसेच सेतू सुविधा केंद्रातील डाटा ऑपरेटर यांच्यामध्ये वाटप करण्यात येवून ऑनलाईन फॉर्म भरण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. वेबबेस्ड एप्लीकेशन लिंक तसेच डॅशबोर्डचा अॅक्सेस लवकर प्राप्त झाल्यास कामात सुसूत्रता व अधिक गतिशिलपणे कामकाज होणार आहे.

योजनेच्या प्रसिध्दीसाठी शासनस्तरावरून प्राप्त आदर्श जाहिरात नमुन्याप्रमाणे नगरपालिका व ग्रामपंचायतमार्फत गावातील दर्शनी भागावर व शिबिरांच्या ठिकाणी जाहिरात फलक लावण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात ऑफलाइन पद्धतीने ८९ हजार ९७ अर्ज तर ऑनलाईन पद्धतीने ४५ हजार ४०१ असे एकूण १ लाख ३४ हजार ४९८ अर्ज प्राप्त झाले आहेत. यात ऑनलाईन व ऑफलाईन असे दोन्ही मिळून आंबेगांव तालुक्यात १६ हजार २७६ अर्ज प्राप्त झाले आहेत. बारामती १७ हजार ५०९, भोर ४ हजार ३७६, दौंड ७ हजार १०८, इंदापूर १० हजार ८४, हवेली १० हजार ६६५, जुन्नर १२ हजार ८४३, खेड १० हजार ३४, मावळ १३ हजार १८३, मुळशी ५ हजार ४५६, पुरंदर ९ हजार ७१८, शिरुर १५ हजार ८४२ वेल्हा तालुक्यात १ हजार ४३४ अर्ज प्राप्त झाले आहेत.

जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थीना लाभ उपलब्ध व्हावा व कोणीही पात्र लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये याची जिल्हा प्रशासनामार्फत संपूर्ण दक्षता घेण्यात येत आहे, असेही श्री. पाटील यांनी कळविले आहे.
००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here