बारामती –
बारामती बाजार समितीची ई-नाम प्रणाली मध्ये उत्कृष्ठ कामगिरी
बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीने शेतकरी व व्यापा-यांच्या हितासाठी मुख्य यार्ड तसेच सुपे व जळोची उपबाजार आवारात विविध सोई सुविधा राबविलेल्या आहेत. बारामती मुख्य यार्ड मध्ये सन २०१९ पासुन रेशीम कोष खरेदी विक्री ई-नाम प्रणाली वापरत असुन बारामती रेशीम कोष खरेदी विक्री केंद्रावर रेशीम कोषाचे रिअल टाईम ई लिलाव पद्धती देशामध्ये प्रथम २८ सप्टेबर २०२२ पासुन सुरू केला आहे. स्मार्ट प्रकल्पांतर्गत बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीला राज्यातील एकुण ३०५ बाजार समित्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे.
भारत सरकारच्या ई-नाम योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतक-यांना सहभागी करण्यासाठी केंद्रीय कृषि शेतकरी कल्याण विभागाने कृषि व्यापार संघा तर्फे लघु चित्रपट बनविला जाणार आहे. त्याकरिता देशातुन ८ राज्यातील आठ बाजार समित्यांची निवड झाली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात एक आणि ती आपली पुणे जिल्ह्यातुन बारामती बाजार समितीची निवड झाली आहे. त्यानुसार डीडी किसान चॅनेल तर्फे बारामती बाजार समितीची विविध उपक्रमांची शुटींग करण्यात आली आहे. डीडी किसान चॅनेल ई-नाम प्रणालीला सहाय्य करणार आहे. त्यामध्ये शेतकरी, एफपीओ, व्यापारी, ई-नामच्या यशस्वी गोष्ट, चित्र प्रसारण करणार आहे. यावेळी समितीचे सभापती सुनिल पवार आणि उपसभापती निलेश लडकत यांनी बारामती बाजार समितीचे विविध उपक्रमांची माहिती सांगुन ई नाम प्रणाली चांगल्या प्रकारे राबविणे बाबत ग्वाही दिली.
बारामती मुख्य यार्ड मध्ये ई नाम प्रणाली मध्ये शेतमालाची गेट एन्ट्री १ लाख झाली असुन ७ लाख क्विंटल आवक नोंदविणेत आली आहे. शेतकरी नोंदणी ६१८३० केली आहे पैकी केवायसी घेऊन ११९६ कायमस्वरूपी शेतकरी तसेच ४४ खरेदीदार, ४२ आडते आणि राज्यातील रेशीम कोष खरेदीदार ७ आणि तामिळनाडु, कर्नाटक, केरळ, तेलंगणा, पश्चिम बंगाल इत्यादी राज्यातील ७ खरेदीदार लायसेन्सधारक नोंदणी झालेली आहेत. सदर रेशीम कोष खरेदीदार ऑनलाईन ट्रेडींग मध्ये सहभागी होत आहेत. रेशीम कोष लिलाव ऑनलाईन घेतले जातात. यामध्ये शेतकरी नोंदणी, गेट एन्ट्री, कोषाची गुणवत्ता तपासणी, सेल रेशो त्यानंतर ऑनलाईन लिलाव आणि ॲक्सिस बँक मार्फत ई पेमेंट केले जाते. सन २०२२ पासुन १७०० शेतक-यांची १३१ टनाची कोष विक्री होऊन साधारण ७ कोटीची उलाढाल झाली आहे. बारामती रेशीम कोष खरेदी विक्री केंद्रामध्ये ई नाम प्रणाली द्वारे १००% ऑनलाईन पद्धती राबविणेत येत असल्याचे सचिव अरविंद जगताप यांनी सांगितले.
भविष्यात गुळ आणि तेलबिया या शेतमाल ई नाम प्रणाली मध्ये घेऊन त्या द्वारे ऑनलाईन पद्धती राबविणेचा समितीचा मानस आहे. बाजार समितीमध्ये येताना शेतकरी बांधवांनी नाव नोंदणी व शेतमाला ची गेट एन्ट्री साठी सहकार्य करावे. तसेच खरेदीदार व आडते यांनी ई नाम मध्ये सहभागी व्हावे. यामुळे देशातील बाजार समित्या एका ई ट्रेडींग प्लॅटफॉर्मवर येणार असुन आंतरराज्यातील व्यापारास चालना मिळणार आहे.
तसेच देशभरातील शेतक-यांना त्यांच्या शेतमालास चांगला व रास्त दर मिळणार आहे. धान्य मार्केटला ई नाम प्रणालीत परपेठेतुन कमी प्रतिसाद मिळत असुन शेतमालाचे ग्रेडींग होऊन ई नाम पोर्टलवर विक्री झाल्यास आंतरराज्य, इंटर मंडी ई लिलाव व ई पेमेंट होऊ शकतात अशी माहिती सचिव अरविंद जगताप यांनी मुलाखती मध्ये सांगितली.