बारामतीत गुरुवारपासून चॉंदशाहवली बाबांचा उरुस
शहरातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेला हजरत पीर चॉंदशाहवली दर्ग्याचा उरुस गुरुवारपासून दि. २५ सुरु होणार आहे. या उरसानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दर्गा कमिटी विश्वस्तांनी दिली.
बारामती : शहरातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेला हजरत पीर चॉंदशाहवली दर्ग्याचा उरुस गुरुवारपासून दि. २५ सुरु होणार आहे. या उरसानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दर्गा कमिटी विश्वस्तांनी दिली. बारामती शहरात क-हा नदीच्या काठावर सुमारे सव्वातीनशे वर्षांपासून हा ऊरुस भरतो आणि त्याला सर्व जाती धर्मातील लोक मोठ्या भक्तीभावाने हजेरी लावतात.
चैत्र पौर्णिमेनंतर हनुमान जयंतीच्या वेळेस हा उरुस भरतो. अनेक वर्षांच्या रिवाजानुसार या उरसाच्या धार्मिक कार्यात ढवाण पाटील, चिंचकर, हिंगणे, देशमुख, देशपांडे, आगवणे, कुंभार, पठाण, सय्यद, पेशवे आदी कुटुंबियांना मान दिला जातो. या उरसानिमित्त क-हा नदीच्या वाळवंटात कुस्त्यांचा दरवर्षी आखाडा रंगतो. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ येथे कुस्त्यांचा आखाडा रंगतो व नामी पैलवान कुस्तीसाठी येथे हजेरी लावतात.
दरम्यान गुरुवारी दि. २५ कुराण पठण होणार असून रात्री संदल मिरवणूक दर्ग्यातून निघून गावात फिरुन पुन्हा रात्री दहा वाजता परत येईल. शुक्रवारी दि. २६ मुख्य नैवेद्याचा कार्यक्रम असून शनिवारी दि. २७ वाघ्या मुरुळी व दुपारी चारनंतर क-हा नदीच्या वाळवंटाच कुस्त्यांचे मैदान रंगणार आहे. रात्री लोकनाट्याचा कार्यक्रम होईल. मध्यरात्री एक वाजता दर्ग्यातून संदल निघणार असून रविवारी दि. २८ ला दुपारी १ ते ४ पर्यंत लंगर जेवण आहे, दुपारी ४ वाजता झेंडा परत दर्ग्यात येईल. दुपारी ४ वाजता उरुसाची सांगता होईल.
असा असतो विविध कुटुंबियाचा मान….
ह. पीर चाँदशाहवली दर्ग्याचे वैशिष्ट्य असे की, हिंदु – मुस्लिम ऐक्याची परंपरा असून येथे सर्व समाज घटकांना मानकरी आणि सेवेकरी म्हणुन मान दिला जातो. संदल निघून कसब्यात जाताना सर्व मंडळी ढवाण-पाटील, देशमुख, देशपांडे, कानिटकर, पेशवे, आगवणे बंधू या सर्वांना घेऊन गांधी चौकात येतो तेथून वाजंत्री घेऊन तांदुळवाडी वेस मधून चिंचकर बंधुना घेऊन गांधी चौकात येतो.
चिंचकर बंधूंचा संदलचा तार आणण्याचा मान आहे. तेथून स्टेशन रोड ला नबाब-पठाण बंधू यांना गांधी चौकात आणतो आम्ही सर्व मानकरी दर्ज्यात येतो तेथे संदल चा हात मारण्याचा मान ढवाण-पाटील, चिंचकर बंधू, नबाब-पठाण बंधू यांचा आहे. आगवणे बंधूचा मशालचा मान आहे. धोकटे बंधूंना मशाल ला लागणारे पलीते देण्याचा मान आहे. झेंडे धरण्याचा मान हिंगणे बंधूंचा आहे.