जिल्ह्यात ३ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन….

जिल्ह्यात ३ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन.... आर्मी अग्निवीर व नियमित भरतीसाठी २२ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

0
110

आर्मी अग्निवीर व नियमित भरतीसाठी २२ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जिल्ह्यात ३ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

पुणे, दि. २१ : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांच्या मार्गदशनाखाली पुणे जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयांमध्ये रविवार ३ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे.

या लोकअदालतीमध्ये धनादेश, बँकेचे कर्जवसुली प्रकरणे, कामगारांचे वाद, विद्युत आणि पाणी देयक बद्दलची प्रकरणे, आपापसात तडजोड करण्याजोगी प्रकरणे, इतर फौजदारी प्रकरणे, वैवाहिक आणि इतर वाद अशी दाखलपूर्व प्रकरणे तसेच न्यायालयात प्रलंबित असलेली मोटार अपघात नुकसान भरपाई, भूसंपादन, महसूल व इतर दिवाणी प्रकरणे ज्यामध्ये भाडे, वहिवाटीचे हक्क, मनाई हुकूमाचे दावे, विशिष्ट पूर्व बंद कराराची पूर्तता विषयक वाद आदी प्रकरणे तडजोडीने मिटविण्याकरीता ठेवण्यात आलेली आहेत.

या लोक अदालतीमध्ये तृतीयपंथीयांचादेखील पॅनल मेंबर म्हणून समावेश केला आहे. लोकन्यायालयात प्रकरण ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागत नाही. लोक न्यायालयातील निवाड्यावर अपील नाही. कोर्टाच्या हुकुमनाम्याप्रमाणे लोकन्यायालयात होणाऱ्या निवाड्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते.

प्रलंबित अथवा दाखलपूर्व प्रकरणे लोक अदालतीमध्ये सुनावणीसाठी ठेवण्याकरिता संबंधित न्यायालयातील तालुका विधी सेवा समिती अथवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या कार्यालयाशी संपर्क साधावा व लोक अदालतीमध्ये सहभागी होवून आपले वाद सामोपचाराने कायमचे मिटवावेत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती सोनल एस. पाटील यांनी केले आहे.

आर्मी अग्निवीर व नियमित भरतीसाठी २२ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. २१: भारतीय सैन्यात आर्मी अग्निवीर व नियमित भरतीसाठी १३ फेब्रुवारी रोजी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर अधिसूचना अपलोड करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळावर २२ मार्चपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन सैन्य भरती कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

या भरती प्रक्रियेत अग्निवीर जी.डी., अग्निवीर तंत्रज्ञ, अग्निवीर कार्यालय सहाय्यक, १० वी व ८ वी उत्तीर्णांसाठी अग्निवीर ट्रेड्समॅन, अग्निवीर महिला सैनिकी पोलिस यांचा तसेच नर्सिंग असिस्टंट/शिपाई फार्मासाठी नियमित भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात उमेदवारांना संगणक आधारित ऑनलाइन परीक्षेला उपस्थित राहणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संकेतस्थळावरील अधिसूचना तपशीलवार वाचावी. विषय अधिसूचनेनुसार एनसीसी उमेदवार, तांत्रिकदृष्ट्या पात्र व्यक्ती, उत्कृष्ट खेळाडू आणि माजी सैनिकांच्या मुलांना बोनस गुण आणि शारीरिक मोजमापातील सूट दिली जाईल. याबाबतचा तपशिल अधिसूचनेत दिलेले आहेत.

लेखी परीक्षेत निवडलेल्या उमेदवारांना संबंधित सैन्य भरती कार्यालयाद्वारे भरती मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी बोलावले जाईल. उमेदवारांच्या वैद्यकीय चाचणीपूर्वी त्यांना अनुकूलता चाचणीला सामोरे जावे लागेल. या चाचणीचा भरती प्रक्रियेत प्रथमच समावेश केला आहे. अनुकूलता चाचणीसाठी उमेदवारांनी रॅलीच्या ठिकाणी पुरेशी बॅटरी लाइफ आणि २ जीबी डेटा असलेला कार्यरत स्मार्टफोन आणणे आवश्यक आहे, असेही सैन्य भरती कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here