बारामतीत प्रशासन पालखी सोहळ्यासाठी सज्ज – पालखी सोहळ्याबाबत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

0
131

बारामती दि. ९ : पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीची सर्व कामे शासकीय यंत्रणेने समन्वयाने करावीत. नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी यांनी पालखी पुढे जात नाही तोपर्यंत नेमणुक केलेल्या ठिकाणी उपस्थित रहावे, अशा सूचना उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिल्या.

पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून अधिकारी व कर्मचाऱ्यासाठी पंचायत समिती बारामती येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी तहसिलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, मुख्याधिकारी महेश रोकडे आदी उपस्थित होते.

श्री. नावडकर म्हणाले, सर्व कर्मच्याऱ्यांनी पालखी मुक्कामाच्या आणि विसाव्याच्या ठिकाणी वारकऱ्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून चांगल्या सेवा द्याव्यात. थंड शुद्ध पिण्याचे पाणी, फिरते शौचालय, महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था, वीज, अग्निशमन पथक, आरोग्य सुविधा, आरोग्य सेवक, आरोग्य दुत, हिरकणी कक्ष, सॅनिटरी पॅड, सलाईन, रुग्णवाहिका इत्यादी सुविधा तयार ठेवाव्यात.

पालखी सोहळ्यात महाराष्ट्रातील तसेच शेजारील राज्यातील लाखो भाविक सहभागी होत असतात. यावर्षी पालखी सोहळा नेहमीपेक्षा अगोदर होत आहे. उन्हाची तीव्रता अधिक आहे. त्यादृष्टीने थंड शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. पाणी थंड करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा बर्फ वापरला जाणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी, अशा सूचनाही श्री. नावडकर यांनी दिल्या.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाचे लखन गायकवाड यांनी विजेचा शॅाक बसल्यास, साप किंवा विंचू दंश झाल्यास, हृदय विकाराचा झटका यासारखी परस्थिती उद्भवल्यास घ्यावयाची खबरदारी याविषयी मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here