छोट्या वृत्तपत्रांसाठी यशस्वी वाटचालीचा मंत्र- किसन भाऊ हासे

0
186

छोट्या वृत्तपत्रांसाठी यशस्वी वाटचालीचा मंत्र
जीवन वाटचालीमध्ये प्रत्येक व्यक्तीस सुख, समाधान, संपत्ती, सत्ता, सन्मान मिळावा असे वाटते. भारतीय संस्कृतीमध्ये सन्मानाच्या, प्रतिष्ठेच्या विविध संकल्पना आहे. ऐहिक आणि भौतिक समाधान व सन्मानासाठी प्रयत्नशील असणार्‍या व्यक्तीस ऐहिक ऐश्‍वर्य मिळविणे कठीण असते की जे ऐश्‍वर्य त्यागी व्यक्तींनी, साधू-संतांनी मिळविले. भौतिक सुखाच्या अपेक्षेने कौटुंबिक वाटचाल करणार्‍या प्रत्येक व्यक्तीस अशीच अपेक्षा असते की मला कर्तबगार संतती लाभावी. किमान गरजेएवढी संपत्ती मिळावी आणि समाजात सर्वांनी आपणास चांगले म्हणावे. असे वाटणे वावगे अथवा चुकीचे नाही मात्र त्यासाठी सामाजिक व सार्वजनिक वर्तनाचे, व्यवसायाचे संकेत खरोखर प्रामाणिकपणे अंगिकारले तर कदाचित संपत्ती फार मिळेल की नाही सांगता येत नाही, मात्र सुख, समाधाना, सन्मान व कर्तबगार संतती मिळू शकते.
जीवन वाटचालीत जगण्यासाठी व कौटूंबिक उदरनिर्वाहासाठी काम करणे अपरिहार्य आहे. जगण्यासाठी काम कुणालाच चुकले नाही. वंशपरंपरेप्रमाणे, परिस्थितीनुसार व प्रशिक्षणानुसार प्रत्येकाचे काम निश्‍चित होते. सत्ताधारी, पुढारी, व्यापारी, अधिकारी, कर्मचारी यासारख्या कार्य वर्गीकरणात रहात असताना वृत्तपत्र क्षेत्रात काम करणे अतिशय श्रेष्ठ व सन्माननीय आहे, परंतू त्यासाठी जीवन जगण्याची व काम करण्याची जी तत्त्वे आहेत ती अंगीकारणे अतिशय महत्त्वाचे आहे. वृत्तपत्र प्रकाशनाचा व्यवसाय करणारे मालक संपादक व त्यांचे सर्व सहकारी यांचेसाठी काही महत्त्वाची चर्चा आम्ही यानिमित्त करीत आहोत. वृत्तपत्र प्रकाशित करणे हा व्यवसाय असला तरी त्याद्वारे सामाजिक प्रबोधन करणे हा सेवाधर्म आहे. वृत्तपत्रक्षेत्रातील सेवाधर्म दीपस्तंभासारखा समोर ठेवून कठोर परिश्रम केले तर समाधान, संपत्ती व सन्मान मिळू शकतो यासाठी अनेक उदाहरणे आहेत.
जिल्हा व तालुका स्तरावर वृत्तपत्रे प्रकाशित करणे प्रारंभी अतिशय अवघड आहे, मात्र अशक्य नाही. वृत्तपत्र दैनिक असो वा साप्ताहिक हे नियमीत प्रकाशित करणे व नियमानुसार प्रकाशित करणे ही सत्त्वपरिक्षा आहे. वृत्तपत्र सृष्टीत अद्यापही एक फार मोठा गैरसमज आहे की कोणतेही शिक्षण वा प्रशिक्षण न घेता पत्रकार होता येते. आजही अनेक असे महाभाग आहेत की वाचता येत नाही मात्र पत्रकार-संपादक म्हणून मिरवतात किंवा पत्रकारितेच्या नावाखाली गैरप्रकार करतात. कोणतेही वृत्तपत्र व्यवस्थित व यशस्वी प्रकाशित करावयाचे असल्यास त्यासाठी किमान या क्षेत्रातील पदवीपर्यंतचे शिक्षण असणे गरजेचे आहे. परंतु काही व्यक्ती एवढ्या कर्तबगार आहेत की अल्पशिक्षण असूनही कठोर परिश्रम व अनुभवाच्या जोरावर संपूर्ण राज्यात वृत्तपत्राच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित करीत आहेत. दैनिक पुण्यनगरीचे मुरलीधर शिंगोटे हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
सर्वांनाच हे जमेल असे नाही, मात्र स्फुर्ती किंवा प्रेरणा म्हणून त्यांचा अभ्यास जरूर करावा. जिल्हा व तालुका स्तरावरील वृत्तपत्रांच्या यशस्वी वाटचालीसाठी आम्ही राज्यस्तरीय संपर्क करून अभ्यास केला असता अनेक संधी दिसून आल्या. अनेक त्रुटी आढळल्या. सर्व गोष्टींचा गोषवारा मांडीत असताना प्रश्‍नांची उत्तरे लिहून मालक संपादकांना पुढील वाटचाल निश्‍चित करता येईल.
वृत्तपत्र प्रकाशनात जाहिरातीतील उत्पन्न हाच एकमेव सनदशिर उत्पन्नाचा मार्ग आहे. वृत्तपत्र विक्री हा तोट्याचा भाग असून वृत्तपत्र विक्रीतील तोटा सहन करून वृत्तपत्र फायदेशीर प्रकाशित करणे यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे आम्ही लिहीत आहोत. शासनमान्य यादीवरील वृत्तपत्रांना ठराविक व मर्यादित जाहिराती असतात. शासकीय जाहिरातींची बिले कधी मिळतील याची खात्री नसते तरी वृत्तपत्र शासनमान्य यादीवर आहे हा अधिकृत असण्याचा एक भाग असल्याने ते महत्त्वाचे आहे.
आर्थिकदृष्ट्या वृत्तपत्र यशस्वी करण्यासाठी आठवड्याचे, महिन्याचे व वर्षाचे कामाचे व उत्पन्नाचे नियोजन महत्त्वाचे आहे. वृत्तपत्रातील सर्वच व्यक्तींचे वर्तन सकारात्मक, समाजाभिमुख व संपर्काभिमुख असावे. उत्कृष्ट संपर्काने व नियोजनाचे उद्घाटन समारंभ, वाढदिवस, सेवानिवृत्ती, दशक्रिया, यात्रा, वर्धापनदिन या प्रकारे 15 प्रकारच्या जाहिराती मिळू शकतात. जाहिरातीचे दर मध्यम ठेवून उत्कृष्ट रचना, तत्पर सेवा, जाहिरात नोंदनीतील अधिकृतपणा, वसूलीसाठी विशेष प्रयत्न ठेवल्यास वृत्तपत्र हळूहळू आर्थिकदृष्ट्या यशस्वी होते. वाचकसंख्या वाढण्यासाठी ताज्या बातम्या, फोटो, लेख, मनोरंजनाची सदरे, प्रासंगिक लेखन असल्यास लोकप्रियता लाभते व जाहिरात संख्या वाढते असा अनुभव आहे.
राष्ट्रीय स्तरावर इलेक्ट्रॉनिक मिडीया आणि प्रिंट मिडीया यांच्या वाटचालीचा विचार केला तर हा व्यवसाय पुर्णपणे मोठ्या भांडवलदारांच्या ताब्यात गेला आहे. हजारो कोटी रूपयांची गुंतवणूक करून भांडवलदारांनी या व्यवसायातही आपले वर्चस्व निर्माण केले आहे. अशाप्रसंगी शासकीय धोरण व नियम भांडवलदारधार्जिणे असतील तर छोट्या वृत्तपत्रांचा भविष्यकाळ अतिशय कठीण आहे. या परिस्थितीत एकविचाराने सर्वांचे संघटन, संपर्क व समन्वय महत्त्वाचा आहे. एकमेकातील मतभेद, वाद विसरून वृत्तपत्रसृष्टीचे अस्तित्व, हक्क आणि कर्तव्ये अबाधीत ठेवण्यासाठी छोट्या वृत्तपत्रांनी संघटीत राहून वाटचाल करणे अपरिहार्य आहे. संख्येने प्रचंड असूनही असंघटीत असल्याने, आर्थिक दुर्बलतेमुळे, संपर्काचा समन्वय नसल्याने छोट्या वृत्तपत्रांचे त्यांचे हक्क पुरेशा प्रमाणात मिळत नाही. यासाठी एकविचाराने संघटीत होणे, वैचारिक समन्वय व संपर्क निर्माण करणे, शासनाशी समन्वयाने अधिकाधिक निधी व हक्क मिळविण्यासाठी उत्तम संघटनास पर्याय नाही.

  • किसन भाऊ हासे
    संस्थापक, दैनिक युवावार्ता व
    सा.संगम संस्कृती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here