आज समाजात खूप काही बदलले दिसते. त्याचे श्रेय महात्मा ज्योतीबा फुले यांना देता येईल
कर्ते सुधारक महात्मा ज्योतीबा फुले
कुरीतियों और रुढीवादी
विचारो से की खूब लढाई
ज्योतिबा फुले ने समाज को
सत्य की ज्योति दिखाई
काळ हा नेहमी बदलत असतो. परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. उपरोक्त दोन वाक्ये नेहमी ऐकणे, वाचणे व अनुभवणे हे समाजात सातत्याने सुरु असते. वास्तविक समाज हा पण अनेक बाबतीत बदलत असतो. हा बदल सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजूने असतो. मात्र दुरदृष्टी ठेऊन समाजाला एक नवी दिशा देऊन सकारात्मक बदल करणार्यांना समाजसुधारक म्हटल्या जाते. त्यातही ‘जशी उक्ती, तशी कृती’, असणार्यांना कर्ते सुधारक म्हणतात. सातत्य ठेऊन समाज उन्नत करणारे समाजसुधारक समाजाची दशा आणि दिशा बदलतात, यात शंका नाही. असेच एक मराठी लेखक, विचारवंत आणि कर्ते समाजसुधारक आणि ‘महात्मा’ची उपाधी प्राप्त थोर महापुरुष महात्मा ज्योतीबा फुले यांची आज १९६ वी जयंती. ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे जन्मलेले ज्योतीराव गोविंदराव फुले प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व होते. त्यांचे कार्य दीपस्तंभ आहे.
महात्मा फुले यांनी शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली. सत्यशोधन नावाची संस्था १८७३ मध्ये स्थापन केली. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढे रोवली. प्राथमिक शिक्षण पुण्यात झाले. तसेच माध्यमिक शिक्षण पुण्यातीलच स्कॉटिश मिशन हायस्कूल येथे इंग्रजी माध्यमातून त्यांनी घेतले. त्यांची बुध्दी अतिशय तल्लख होती. त्यांना मराठी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, तामिळ आणि गुजराती अशा सहा भाषा येत असत. कृष्णराव भालेकर यांच्या सहाय्याने १८७७ साली ‘दिनबंधु’ वृत्तपत्र सुरु करुन त्यांनी लोक जागृतीचे कार्य केले. जनतेने १८८८ मध्ये मुंबईतील सभेत त्यांना ‘महात्मा’ ही उपाधी बहाल केली होती. वास्तविक १८८७ मध्ये त्यांना पक्षघाताचा आजार झाला होता. तर नोव्हेंबर १८९० रोजी त्यांचे निधन झाले.
एकूण ६३ वर्षाच्या आयुष्यात त्यांनी केलेला संघर्ष आणि समाजाला दिलेले योगदान दोनही टोकाचे होते. त्यांचे मुळगाव कटगुण ता.खटाव, जि. सातारा हे होते. आजोबा शेरीबा गोर्हे हे माधवराव पेशव्यांच्या दरबारात सजावटचे काम करायचे म्हणून पेशव्यांनी ३५ एकर जमीन फुलांच्या व्यवसायासाठी दिली, त्यानंतर फुले म्हणून ओळखले जावू लागले. तर काका राणोजींनी ती ३५ एकर जमीन हडपली तेव्हा ज्योतीबाचे वडील गोविंदराव भाजीपाल्याचा व्यवसाय करु लागले. ज्योतीबा केवळ ९ महिन्याचे असतांना आई चिमणाबाईचे निधन झालेले, तर १२ वर्षाचे असतांना सावित्रीबाई यांचेशी (१८४०) विवाह झाला.
ज्योतीबांनी सावित्रीबाईंना साक्षर करुन भारतातील पहिली स्त्री शिक्षीका व पहिली प्रशिक्षीत मुख्याध्यापिका बनविले. त्यावेळी शुद्रांसाठी शिक्षणाच्या कार्यामुळे विरोध बघून ज्योतिबांना पत्नीसोबत गृहत्याग करावा लागला. ज्योतीबांनी १८४८ रोजी बुधवार पेठेत भिडेंच्या वाड्यात भारतातील मुलींची पहिली शाळा सुरु केली. पहिल्या दिवशी फक्त ८ मुली उपस्थित होत्या. नंतर ३ जुलै १८५१ रोजी चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा, १७ सप्टेंबर १८५१ तिसरी शाळा आणि १५ मार्च १८५२ चवथी मुलींची शाळा सुरु केली. विद्यार्थ्यांसाठी छात्रालय तर प्रौढांसाठी पहिली रात्रशाळा १८५५ मध्ये काढली. ते १० वर्षे (१८७३ ते ८२) पुणे न.प. चे सदस्य होते.
ज्योतीबांचे शैक्षणिक कार्य तर अजरामर आहेच, सोबतच त्यांनी ‘तृतीयरत्न’ नाटक आणि ‘गुलामगिरी’ व ‘शेतकर्यांचा आसूड’ हे ग्रंथ लिहिले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला, महाराजांचा पोवाडा रचला, सामाजिक विषमतेविरुध्द कार्य केले, १८६४ मध्ये पुनर्विवाह घडवून आणला, भारतातील पहिले ‘बालहत्या प्रतीबंधक गृह’ उघडले अनाथ बालिका आश्रम काढला, अस्पृश्यांसाठी १८५२ मध्ये वेताळपेठेत शाळा काढली, पाण्याचा हौद खुला केला.
ज्योतीबांच्या शिकवणचा प्रभाव म्हटले तर त्यांच्या निधनानंतर अंतयात्रेच्या वेळी टिटवे धरतो त्याला वारसा हक्क मिळत असल्याने ज्योतीरावांचे पुतणे आडवे आले आणि दत्तक पुत्र यशवंतरावांना विरोध केला तेव्हा सावित्रीबाई धैर्याने पुढे आल्या व स्वत: टिटवे धरले त्यांनीच ज्योतीबांच्या पार्थिवाला अग्नि दिला. तर दुसरे उदाहरण म्हणजे दत्तक पुत्र यशवंतराव यांना विधवेचा मुलगा म्हणून कोणीही मुलगी देत नव्हते. तेव्हा कार्यकर्ता ज्ञानोबा कृष्णाजी ससाने यांच्या राधा नावाच्या मुलीशी ४ फेब्रुवारी १८८९ रोजी विवाह करुन देण्यात आला आणि हा विवाह महाराष्ट्रातील पहिला (१३४ वर्षापूर्वीचा) आंतरजातीय विवाह ठरला.
आज समाजात खूप काही बदलले दिसते. त्याचे श्रेय महात्मा ज्योतीबा फुले यांना देता येईल. तर महात्मा गांधीनी म्हटल्याप्रमाणे ते ‘असली महात्मा’ होते.
शेवटी महात्मा फुले यांच्या समाजकार्यातून मिळालेल्या संदेश बाबत एक शेर आठवतो...
हर तबके का उत्थान जरुरी है,
हर गरीब का सम्मान जरुरी है,
भगवान होना तो दूर की बात है,
बनना इंसान को इंसान जर
rajeshrajore@gmail.com