नवसालापावणारे राष्ट्रवादीचे झाड…!
संपूर्ण महाराष्ट्रात पक्षफुटीचा जोर सुरू आहे. बारामतीत चहा पिताना एक निष्ठावंत कार्यकर्ता व्यथीत झाला होता.’राष्ट्रवादी पक्ष फुटायला नको होता’ असं त्याचं टुमणं सुरूच होतं.
तो रडकुंडीला आला होता. तेव्हा दुसरा कार्यकर्ता म्हटला एवढीच काळजी आहे, तर कर की राष्ट्रवादीच्या झाडाला नवस.. त्याचं हे वाक्य ऐकलं आणि मला एक जुनी घटना आठवली.
एकेदिवशी मला एकाचा फोन आला. ‘आज अंनिसची मिटींग आहे ना? माझे एक काम आहे .’मी त्याला मीटिंगच्या ठिकाणी बोलवले. साधारणत: तो पंचवीशीतला तरूण असेल.
आल्या आल्याच त्याने सांगितले. ‘बारामतीत एक नवसाला पावणारे राष्ट्रवादीचे झाड आहे.
ज्याला अनेक लोक नवस बोलायला जातात’ हे ऐकूण क्षणभर आम्हीही गोंधळलो. तेव्हा त्याने पिशवीतून 27 ऑगस्ट 2010 ला प्रसिद्ध झालेला ‘बारामतीचा महानायक’ या साप्ताहिकाचा अंक काढला. ज्यामध्ये या झाडाबद्दल माहिती होती.
बारामतीतील आमराई भागात एका ठिकाणी हे झाड होते. तो रस्ता रहदारीचा असल्याने शाळकरी विद्यार्थी व कामाला जाणारे कामगार यांचा मोठ्या प्रमाणावर राबता असायचा.
याच झाडाच्या कट्ट्यावर राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते रोज सकाळी गप्पा ठोकत बसलेले असायचे.
नेमक्या गप्पा रंगात आलेल्या असायच्या परंतु कायम गडबडीत चाललेले लोक त्या पारावर बसलेल्या कार्यकर्त्यांना ‘टाईम किती झाला’ असे विचारायचे. यामुळे गप्पांमध्ये व्यत्यय यायचा.गप्पांचा रसभंग व्हायचा. हे सतत होऊ नये म्हणून एकदा एका कार्यकर्त्याने एक शक्कल लढवली. भिंतीवरचे घड्याळ त्याने झाडावर टांगले. येता जाता लोकांना टाईम कळू लागला.
पण अनेकांना कळेना अचानक झाडाला घड्याळ का बरं लावलं असेल. काही लोक त्या कार्यकर्त्यांना सतत विचारायचे हे घड्याळ येथे का लावले. तेव्हा एका खोडसाळ कार्यकर्त्यांने सहज उत्तर दिले. ‘माझा मुलगा बरा होत नव्हता. कशानेही गुण येत नव्हता.मी या झाडाला घड्याळाचा नवस बोललो.माझा मुलगा बरा झाला.
मला गुण आला. म्हणून मी हे घड्याळ बांधले’. झालं ही अफवा वाऱ्यासारखी त्या परिसरात पसरली. अशिक्षितपणामुळे व आशेने लोक त्या झाडाकडे जाऊ लागले.कालांतराने त्या झाडाला आणखी घड्याळे दिसू लागली. एकमेकांला येणारे गुण, बोललेले नवस याच्या चर्चा वाढत राहिल्या. आणि एकेदिवशी हे झाड फळांऐवजी घड्याळांनीच गच्च भरले.
असं हे नवसाला पावणारं राष्ट्रवादीचं झाड. या घटनेला तेरा वर्षे उलटली. कालांतराने लोकांच्या विचारात सुधारणा झाली.त्या झाडाला घड्याळ बांधणेही बंद झाले. परंतु सहज खोडसाळपणे केलेल्या एका विधानामुळे अंधश्रद्धा कशी पसरते, ते आठवलं….