जागतिक आरोग्य दिन
जागतिक आरोग्य संघटना (W.H.D.) ७ एप्रिल १९४८ रोजी जिनेव्हा शहरी अस्तित्वात आली. ही संघटना जगातील सर्व लोकांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारण्यास, आयुर्मर्यादा वाढविण्यासाठी लोककल्याणासाठी निर्माण झाली. म्हणून ७ एप्रिलचा दिवस ‘जागतिक आरोग्य दिन’ म्हणून साजरा होतो.
विश्व आरोग्य संघटना (W.H.O.) व युनिसेफ यांच्या वतीने १२ सप्टेंबर १९७८ ला रशियातील अल्माआटा येथे भरलेल्या जागतिक आरोग्यतज्ज्ञांच्या परिषदेत इ.स. २००० पर्यंत ‘सर्वांसाठी आरोग्य’ या उद्दिष्टाची घोषणा करण्यात आली. पण अशी अपेक्षित आरोग्यप्राप्ती आपण साध्य करू शकलेलो नाही, असेच म्हणावे लागेल!
‘हू’ची आरोग्याबाबतची व्याख्या अशी आहे की, “ज्या व्यक्तीला कुठलेही शारीरिक व्यंग, व्याधी नाही. तसेच ज्या व्यक्तीचे मानसिक संतुलन शाबूत असून जी व्यक्ती आपले सामाजिक जीवन योग्य तऱ्हेने जगण्यास सक्षम आहे, ती खरी आरोग्यवान व्यक्ती होय. “
“जी व्यक्ती सुदृढ असते, ती व्यक्ती आशावादी राहू शकते, व आशावादी व्यक्तीच जगातील कितीही कठीणतम कार्य पार पाडू शकते.’ असा एक सुविचार आहे. गर्द, जुगार, दारू, गुटखा, पान-तंबाखू इ. व्यसनांच्या अधीन झालेली कमकुवत मनाची तरुण पिढी, जी क्षुल्लक कारणासाठी आत्महत्येचा विचार करते, विध्वंसक अनीतीने वागते हे थांबवायचे असेल तर आरोग्याविषयीच्या बऱ्याच बाबींकडे विद्यार्थी दशेपासून लक्ष द्यायला हवे. उदा. स्वतःच्या शरीराची स्वच्छता, स्वच्छ अन्नपाण्याचे सेवन, व्यायाम-खेळ मनोरंजनाचे महत्त्व, नीट चालणे-बसणे उभे राहणे, वाहतुकीचे नियम, पोहण्याचे तंत्र, व्यसनांपासून दूर राहणे; योग ध्यान प्रार्थनांनी मन सच्छील खंबीर निग्रही बनविणे, प्रथमोपचारांची माहिती करून घेणे, आजार अंगावर न काढणे व वेळीच निदान करून घेणे; अपायकारक प्राणी- कीटकांपासून संरक्षण; वीज-आगीपासून अपघातांपासून संरक्षण इ. आरोग्यवर्धनाच्या चांगल्या सवयी लागल्यासच सशक्त, सुदृढ, बलशाली भारत निर्माण होईल. यासाठी आरोग्य शिक्षण व शिक्षकांचीही नितांत गरज आहे. जागतिक आरोग्य संघटना; लोकांचे सार्वजनिक आरोग्य, रोगप्रतिबंधक उपाय, विविध औषधे व लसींबाबतची आंतरराष्ट्रीय परिमाणे, अणुशक्ती व किरणोत्सार्गाने उद्भवणारे आजार, शिशुसंगोपन-अन्नपोषण मार्गदर्शन, गरोदर स्त्रिया व मातृशुश्रुषा इत्यादी अनेक बाबींचा विचार करून जगातील लोकांच्या आरोग्याची पातळी उंचावण्याचे कार्य करते.