



























































“हॅपी स्ट्रीट” ने बारामतीला दिला बालपणाचा आनंद…….!
बारामती, तारीख होती २६ आणि २७ त्या संध्याकाळी दुसऱ्या दिवशी सकाळच्या हवेची झुळूक तर कोवळ्या उन्हात, मोकळ्या रस्त्यावर खेळणारी लहानग्यांची पावलं… त्यांच्या मागोमाग नृत्यात रंगलेले आई-वडील… हातात बासरी, माउथऑर्गन, सिंथेसायझरवर गाजणारी सुरेल गाणी… आणि चित्रांतून बोलू लागलेले रंग…! असाच काहीसा अनोखा अनुभव बारामतीकरांना मिळाला “हॅपी स्ट्रीट्स बारामती” या बहारदार उपक्रमाच्या निमित्ताने!
एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित आणि सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या दोन दिवसांच्या उत्सवात बारामतीने अक्षरशः झिंगून टाकलं. युवा नेते पार्थ पवार यांच्या उपस्थितीत, अति. पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, मुख्याधिकारी पंकज भुसे, यांच्यासह अनेक मान्यवरांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती.
शनिवारी रात्री जुन्या-नव्या गाण्यांच्या तालावर बारामतीकरांनी मनसोक्त नृत्य केलं, तर रविवारी सकाळी हवेतला गारवा, रस्त्यावरचे खेळ आणि गप्पांची साथ यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य खुललं. खाऊगल्लीत खाद्यप्रेमींनी ताव मारला तर चित्रकला, टॅटू, फेसपेंटिंगने मुलांचे चेहरे खुलले.
सापशिडी, लुडो, धनुर्विद्या, स्केटिंग, मल्लखांब, लाईव्ह म्युझिक, योग, क्राफ्ट, वारली पेंटिंग… काही नाविन्यपूर्ण, काही पारंपरिक – पण सगळंच मन हेलावणारं. “विद्या कॉर्नर ते गदिमा सभागृह” या संपूर्ण रस्त्यावर बारामतीकरांनी बालपण पुन्हा अनुभवले!
“हा उपक्रम दर महिन्याला व्हावा,” अशी मागणी अनेकांनी केली.
कोणी म्हणाले, “किती दिवसांनी संपूर्ण कुटुंबाने एकत्र असे क्षण उपभोगले!”
तर काहींनी थेट भावनिक होत “बालपण परत मिळालं,” असे उद्गार काढले.
“हॅपी स्ट्रीट्स” हा केवळ कार्यक्रम नव्हता, ती होती एका शहराच्या चेहऱ्यावर फुललेली हास्यरेषा!