हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४ अंतर्गत ‘द्राक्ष महोत्सव २०२४’ चे उद्घाटन.
पुणे, दि.१८: पर्यटन संचालनालय आयोजित ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४’ अंतर्गत कृषी विभाग, जुन्नर पर्यटन विकास संस्था, जुन्नर तालुका द्राक्ष उत्पादक संघ आणि कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्नर येथे ‘द्राक्ष महोत्सव २०२४’ चे कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष कृषीरत्न अनिल मेहेर यांच्या उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पर्यटन संचालनालय पुणे विभागाच्या उपसंचालिका शमा पवार, ग्रामोन्नती मंडळ नारायणगावचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कृषी विज्ञान केंद्र नारायणगावचे प्रमुख डॉ. प्रशांत शेटे, कृषी तंत्रनिकेतनचे प्राचार्य राधाकृष्ण गायकवाड आदी उपस्थित होते.
द्राक्ष किंग २०२४ स्पर्धेचे आयोजन
पर्यटकांसाठी द्राक्षबागा भेटी, द्राक्ष, बेदाणे आणि द्राक्षज्यूस विक्री तसेच द्राक्ष उत्पादकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी द्राक्ष पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम क्रमांक द्राक्षकिंग आणि उत्तेजनार्थ चार पारितोषिके देण्यात येणार आहेत. द्राक्षकिंग २१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व सपत्नीक सन्मान तसेच चार उतेजनार्थ शेतकऱ्यांना प्रत्येकी ११ हजार रुपये, सन्मानचिन्ह व सपत्नीक सन्मान बक्षिसाचे स्वरूप आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक कृषीभूषण जितेंद्र बिडवई यांनी दिली.
गेल्या सहा वर्षांपासून हा द्राक्ष महोत्सव जुन्नर तालुक्यात होत असून आता हा ‘हिंदवी स्वराज्य महोत्सवाचा’ भाग झाला आहे. तालुक्यात निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन होत असून यामुळे तालुक्याचे ग्रीन झोन म्हणून वेगळे महत्त्व प्रस्थापित होत आहे. हा महोत्सव १९ फेब्रुवारी पर्यंत सुरु राहणार असून याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
००००