स्व.राजीवभाई दीक्षितांच्या स्वदेशी विचारांची गरज !

0
268

स्व.राजीवभाई दीक्षितांच्या स्वदेशी विचारांची गरज !

सचमुच जिंदगी वह है,
जो कइयोंके गम सँवारे,
खुद मिटे दुसरो के
गम मिटाने के लिए।
उद्या ३० नोव्हेंबर. एक विद्वान, वैज्ञानिक, महापुरूष तसेच स्वदेशीचे खंदे समर्थक राजीवभाई दीक्षित यांचा जन्मदिवस तसेच १२ वा स्मृतिदिन. संपूर्ण भारतात आझादी बचाओ आंदोलनाचे नेते म्हणून सुपरिचीत राजीवभाई फक्त ४३ वर्षे जगले. शेवटच्या काळात रामदेवबाबांसोबत (२००९ पासून) जुळले. त्यांनी भारत स्वाभीमान ट्रस्टच्या राष्ट्रीय सचिवपदीही कार्य केले. त्यांच्या अल्प आयुष्यात त्यांनी केलेले कार्य, दिलेले स्वदेशी विचार तसेच आयुर्वेदचा केलेला प्रचार, बहुराष्ट्रीय कंपनीचे ‘भारत लुटो’ धोरणाबाबत जनजागरण, कर पध्दतीचे विकेंद्रीकरण कसे फायद्याचे, तर कर वसुलीची ८० टक्के रक्कम राजकारणी व सरकारी अधिकार्‍यांवर खर्ची करण्यास विरोध आणि नोकरशहांची मनमानी, आदींबाबत जागरूकता निर्माण केली. आझादी बचाओ आंदोलनाचे संस्थापक म्हणून सन १९९० पासूनचे त्यांचे कार्य विशेष प्रेरणादायी राहिले. इतिहासकार प्रोफेसर धर्मपाल व आझादी बचाओचे संस्थापक प्रो. बनवारीलाल शर्मा हे त्यांचे प्रेरणास्थानी होते.
‘राजीवभाई’ या नावाने भारतभर परखड व्याख्याते म्हणून परिचीत असणारे राजीव दीक्षित हे राधेश्यामजी दीक्षित व मिथीलेशकुमारी दीक्षित यांचे सुपूत्र होते.

अलीगढ (उत्तर प्रदेश) जिल्ह्यात नाह या गावी ३० नोव्हेंबर १९६७ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण फैजाबाद येथे झाले. नंतर अलाहाबाद (१९९४) तर उच्च शिक्षण भारतीय औद्योगिकी संस्थान कानपूर येथून झाले. त्यांनी एम.टेक.पर्यंत शिक्षण घेतले. मात्र शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच ते चळवळीत सक्रीय झाले. सुरूवातीला शहीद भगतसिंग, उधमसिंग, चंद्रशेखर आझाद आणि नंतर महात्मा गांधींच्या विचाराने प्रभावीत होते. ते खेड्यातील जीवनपध्दती हीच खरी जीवनशैली मानत.
दरम्यान, काही काळ त्यांनी भारताच्या ‘वैज्ञानिक एवं औद्योगिक अनुसंधान परिषद’, (सीएसआईआर) तसेच फ्रांसच्या टेलीकम्युनिकेशन सेंटरमध्ये काम केले. त्यानंतर भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दूल कलाम यांचेसोबत जुळले. दरम्यान काही परियोजनांवर विदेशात शोधपत्रांचे वाचन केले. ‘संशोधनाचे कार्यात चंद्रावरील दगडाचे संशोधनपेक्षा भारतीय बैलगाडीला बेरींग लावून बैलांचे ओझे व शेतकर्‍यांची सुविधा कशी होवू शकते, यावर व अशा कृषी आधारीत यंत्रावर संशोधन व्हावयास पाहिजे, असे राजीवभाई सांगत असत. तसेच देशातील विचारवंतांनी शेतीच्या क्षेत्रात मोठे पर्याप्त असे कार्य केले नाही, अशी खंत व्यक्त करीत असत.
‘‘मैं भारत को भारतीयता की मान्यता के आधार पर फिर से खडा करना चाहता हूँ, उस काम मे लगा हुवा हूँ।’’ असे सांगणारे राजीवभाईंनी बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून भारतवासीयांची होणारी लूट थांबविण्यासाठी हजारो ठिकाणी भाषणे देऊन प्रबोधनाची चळवळ उभी केली. विदर्भात प्रामुख्याने शेतकरी नेते व देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाशभाऊ पोहरे यांनी त्यांना समर्थ साथ दिली. देशोन्नतीने ‘आझादी बचाओ आंदोलन’ डोक्यावर घेतले, त्यांचा नियमित स्तंभ चालविला. त्यांच्या ठिकठिकाणी सभा लावल्या. राजीवभाईंनी वर्धा सेवाग्राम भागात स्वदेशी जागरण कार्यालय सुरू केले होते.
आपण सकाळपासून (ब्रश, पेस्ट, साबण) रात्रीपर्यंत कशा विदेशी वस्तू वापरतो, त्याला स्वदेशी पर्यायी वस्तू कोणत्या, आपली भारतीय सुंदर जीवनशैली कशी योग्य व प्रभावी आहे, हे सांगून निरोगी आरोग्यासाठी ऋषी, मुनींची शैली व आयुर्वेदमधील उपचार त्यांनी प्रभावीपणे मांडलेत. त्यांनी अ‍ॅलोपॅथीचा विरोध केला. त्यांच्या भाषणाला प्रचंड गर्दी होत असे. त्यांच्या आरोग्यविषयक ज्ञानामुळे कोट्यवधी लोकांचे आयुष्यात बदल झाला ते लोक आजही सुखदपणे आयुष्य जगत आहेत. त्यांची अनेक भाषणे सोशल मीडियावर उपलब्ध असून आजही समयोचित वाटतात. राजीवभाईंचा मृत्यू भाषणानंतर हृदयविकाराने भीलाई (छत्तीसगड) येथे झाला.
राजीवभाईंनी स्वदेशी वस्तू वापर संबंधी व निरोगी आरोग्यासाठी भारतीय जीवनशैलीच्या प्रचारासाठी केलेले कार्य व समर्पण अजरामर आहे. त्यांच्या विचारांची आजही तेवढीच गरज आहे, असे कोट्यवधी समर्थकांना वाटते. हीच खरी श्रध्दांजली ठरते. एवढे मात्र खरे!
शेवटी स्वदेशी विचारांच्या बाबतीत लोकचं निर्णय घेतील, या आशयाचा शेर आठवतो…
अब हवाएँ ही करेगी
रोशनी का फैसला,
जिस दिए में जान होगी,
वो दिया रह जाएगा…
– – – राजेश राजोरे
खामगाव, जि. बुलढाणा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here