स्व.अजित दादा पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त VPKBIET मध्ये भव्य रक्तदान शिबिर; ३२७ जणांचे रक्तदान….

0
5

स्व. अजित दादा पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त VPKBIET मध्ये भव्य रक्तदान शिबिर; ३२७ जणांचे रक्तदान….

बारामती : “रक्तदान हेच श्रेष्ठदान” या उदात्त भावनेला साकार रूप देत विद्या प्रतिष्ठान कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था (VPKBIET) येथे स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या प्रथम मासिक स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागामार्फत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल ३२७ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून मानवतेचा जिवंत संदेश दिला.
सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडलेल्या या उपक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच बारामतीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. युवक-युवतींनी मोठ्या उत्साहात रक्तदान करून सामाजिक बांधिलकीची जाणीव कृतीतून दाखवून दिली. प्रत्येक रक्तदात्याच्या चेहऱ्यावर समाधान आणि सेवाभाव स्पष्ट दिसून येत होता.
या शिबिरातून संकलित झालेले रक्त विविध रुग्णालयांतील गरजू रुग्णांच्या उपचारासाठी उपयोगी पडणार असून अनेकांना जीवनदान देण्यास ते कारणीभूत ठरणार आहे. त्यामुळे हा उपक्रम केवळ श्रद्धांजली न राहता समाजासाठीची महत्त्वपूर्ण सेवा ठरली.


या यशस्वी आयोजनासाठी विद्या प्रतिष्ठान व्यवस्थापनाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या सचिव निलिमा ताई गुजर व प्राचार्य डॉ. एस. बी. लांडे यांनी विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणीवेचे कौतुक केले. सर्व अध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. उमेश जगदाळे व सौ. श्रीमंती रोकडे यांनी नियोजन व समन्वय प्रभावीपणे पार पाडला. विद्यार्थी समन्वयक सिद्धांत शितोळे, अथर्व कावळे, जलोघ पवार, शिवम मेहेरकर, ओम ठोंबरे, संस्कार मदने तसेच NSS स्वयंसेवकांनी नोंदणी व व्यवस्थापनाची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली.
स्व. अजित दादा पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत असून विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, सामाजिक उत्तरदायित्व आणि मानवी मूल्यांची जाणीव अधिक दृढ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here