स्वप्नांच्या मागे ऊर फुटेपर्यंत धावताना वेळेशी स्पर्धा करावी लागते. दिवसाचे २४ तास कमी पडतात. आपली स्पर्धा घड्याळाच्या मिनिट काट्याशी सुरु होते. नेहमी काहीतरी गाठण्यासाठीची धावपळ आपली दिनचर्या होऊन जाते. मग हळूहळू माणसांचे मशिनमध्ये रुपांतर कधी आणि कसे होऊन जाते हे आपल्यालाही कळत नाही. स्वप्नांचा पाठलाग करताना नेमकी कोणती स्वप्ने आपली खरी स्वप्ने होती आणि कोणती स्वप्ने ही इतरांच्या कल्पनेतले संपन्न आयुष्य जगण्यासाठी आपणही गरजेची समजू लागल्याने विनाकारण लादून घेतलेली असतात हे लक्षात येइपर्यंत तुमचेमाझे आयुष्य अर्धेअधिक संपून जाते. माणसाने समृध्द,संपन्न,वैभवशाली आयुष्य जगलेच पाहीजे या मताशी मीही सहमत आहे. नोकरी – व्यवसायाच्या निमित्ताने दैनंदिन कामासाठी आपण जो वेळ देतो तो नेमका जगण्यासाठी आवश्यक गोष्टींची पुर्तता करण्यासाठी देतोय की तथाकथित स्टँडर्ड लाईफस्टाईल मिळविण्यासाठी आपला अधिकचा वेळ देतोय हेही स्वतःला विचारायला हवं.
चला मुद्यावर येऊया. फार ताण न घेता एवढे मात्र नक्कीच करा. तुमची रुटीन कामकाजाची आवश्यक धावपळ सुरु ठेवा. पण हे करताना जाणीवपुर्वक ब्रेक घेत चला. कामाच्या किंवा आर्थिक अडचणींमुळे सध्या सुट्टीसाठी मोठे ब्रेक घेणे शक्य नसल्यास छोटे छोटे ब्रेक घ्या.कधीतरी सगळी काम ठरवून बाजूला करा. जवळचेच एखादे असे ठिकाण शोधा. तिथे सगळे व्याप,ताण विसरून निसर्गाशी एकरुप होण्याचा प्रयत्न करा. मग हळूहळू दुरवरच्या रस्त्यावरून जाणार्या गाड्यांचा आवाजही कमी कमी होत जातो. आजूबाजूच्या इमारतींमधील कृत्रिम प्रकाशातील दिव्यांचा झगमगाटही मंद होत जातो. आजूबाजूला कोणी आहे याचा विसर पडत जातो. अशा ठिकाणी
स्वतःला निसर्गाशी एकरुप करताना होणार्या अवस्थेला नेमके समाधी म्हणतात की मोक्ष म्हणतात ते मला सांगता येणार नाही. दिवसभराच्या धावपळीत पंधरा- वीस मिनिटांचा असा छोटा ब्रेकही आपल्याला मानसिकरित्या ताजेतवाने करतो.
स्वतःला Relax करणारी किंवा Charge करणारी अशी अनेक स्टेशन्स शोधण्याचा छंद आपले आयुष्य समृध्द करतो.
आज मीही अशाच छोट्या ब्रेकच्या निमित्ताने थोडा निवांत होतो. संत ज्ञानेश्वरमाऊली आणि संत तुकोबारायांचा पालखी सोहळा पुण्यातून पंढरपूरच्या दिशेने मोठ्या भक्तीभावात सुरु झालेला आहे.
त्यामुळे जगद्गुरु संत तुकोबारायांचा अभंग आठवण्याचा प्रयत्न करतोय.
” मृगजळ दिसे साचपणा ऐसें । खोटीयाचे पिसें ऊर फोडी ।।
जाणोण का करा आपुलाले घात । विचारा रे हित लवलाहीं।। “
- शशांक मोहिते
9960066966