‘सी- व्हिजिल’ ॲपवर दाखल 301 तक्रारींवर पहिल्या शंभर मिनीटात कार्यवाही- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
पुणे, दि. 26: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात ‘सी-व्हिजिल’ ॲपवर आदर्श आचारसंहिता भंगाच्या 333 तक्रारीवर कार्यवाही करण्यात आली आहे. त्यापैकी 301 तक्रारींवर पहिल्या 100 मिनिटात कार्यवाही करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.
निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार, नागरिकांना थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ‘सी व्हिजिल’ ॲप विकसित केलेले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर 100 मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे.
या ॲपवर जिल्ह्यात नागरिकांकडून 352 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी 333 तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली आहे. तर त्यापैकी आंबेगाव विधानसभा मतदार संघात 5 तक्रारी, बारामती 12, भोसरी 1, चिंचवड 6, दौंड 4, हडपसर 3, इंदापूर 1, जुन्नर 3, कसबा पेठ 28, खडकवासला 5, मावळ 6, पर्वती 61, पिंपरी 2, पुणे कॅन्टोन्मेंट 20, शिवाजीनगर 7 आणि वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात 137 अशा एकूण 301 तक्रारींवर पहिल्या शंभर मिनीटात कार्यवाही करण्यात आली आहे.
‘सी व्हिजिल’ ॲप अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी, वापरकर्त्यांनी फक्त ॲप उघडणे, उल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशिल, स्थान, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हीडिओ अपलोड करणे आवश्यक आहे. या ॲप तक्रार दाखल करणाऱ्या तक्रारदाराची ओळख गुप्त राखण्यात येते.
0000