साप्ताहिक संपादकांनो आता तरी संघटीत व्हा, संघर्ष करा – किसन भाऊ हासे

0
117

साप्ताहिक संपादकांनो आता तरी संघटीत व्हा, संघर्ष करा – किसन भाऊ हासे


अन्यायनिर्मूलनासाठी साप्ताहिक संपादक राज्य परिषदेची स्थापना
प्रसार माध्यम क्षेत्राचा उगम साप्ताहिक वृत्तपत्रांपासून असला तरी साप्ताहिक वृत्तपत्रे अस्तित्त्वहीन होत आहेत. महाराष्ट्रात 2500 पेक्षा अधिक नोंदणीकृत साप्ताहिक वृत्तपत्रे असून नियमीत प्रकाशीत होणारी वृत्तपत्रे 1000 पेक्षा कमी आहेत. नियमीत प्रकाशित होणार्‍या साप्ताहिक वृत्तपत्रांनी अधुनिक तंत्रज्ञानाचा स्विकार, सामाजिक आधार व शासनाचे सहकार्य घेतले तरच ही वृत्तपत्रे यशस्वीपणे प्रकाशित होतील. केवळ नावासाठी किंवा जाहीरात मिळाली तर प्रसिद्ध होणार्‍या साप्ताहिकांचा भविष्यकाळ अतिशय वाईट आहे. साप्ताहिक वृत्तपत्रे जीवंत रहाण्यासाठी साप्ताहिक संपादकांनी संघटीत झाले तरच त्यांचे अस्तित्व राहील. असंघटीतपणामुळेच सरकारच्या प्रसिद्ध विभागाने शासनमान्य यादीतील साप्ताहीकांना कचर्‍यासमान लेखून विशेष प्रसिद्धी अभियानाच्या जाहीरातीपासून वंचीत ठेवले आहे.


उच्च, मध्यम, लघु संवर्गातील दैनिकांना लाखोंच्या जाहीराती प्रसिद्धीस दिल्या असतांना साप्ताहिकांना एकही जाहीरात मिळू शकली नाही. याचे एकमेव कारण म्हणजे साप्ताहिक संपादकाचा असंघटीतपणा आहे.


स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळापासून साप्ताहिक वृत्तपत्रे राज्यात प्रसिद्ध होत असतांना अनेक लढ्यांमध्ये, चळवळींमध्ये साप्ताहिक वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वपूर्ण राहीली आहे. महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, दीनमित्रकार मुकूंदराव पाटील, आचार्य अत्रे, भगवंतराव पाळेकर, बाळ ठाकरे, वजू कोटक यांच्या सारख्या अनेक संपादकांनी सुरू केलेली साप्ताहिक वृत्तपत्रे मोठा जनाधार मिळवून समाज प्रबोधनाची कामे करीत होती. या सर्व ऐतिहासिक परंपरेचा वारसा विद्यमान साप्ताहिक संपादक विसरले आणि लाभार्थी, पोटार्थी अशी अवस्था झाल्याने समाजातील प्रतिमा खराब झाली आणि मायबाप सरकारही साप्ताहिकांना विसरून गेले आहे.
साप्ताहिक संपादक बंधू-भगिणींनो अधुनिक तंत्रज्ञानाने प्रसारमाध्यम क्षेत्रातील भांडवलदारांची मक्तेदारी मोडीत काढली आहे. आम्हीच सर्वश्रेष्ठ म्हणार्‍यांना कोरोनाने धडा शिकविला आणि सोशल मिडीयाने माहीताचा स्फोट घडवून आणला आहे. एखादी घटना काही मिनिटात जगात पोहचविण्याचा चमत्कार सोशल मिडीया घडवीत असतांना स्वत:चे न्युज पोर्टल सुरू करून काही संपादक कोट्यावधी वाचकांपर्यंत पोहवून लाखोंची कमाई करीत आहेत. जे साप्ताहिक संपादक सरकारी जाहीरातींच्या चार तुकड्यांची वाट बघत आहे ते स्वत:चे अस्तित्व विसरतात त्यांनी वृत्तपत्रसृष्टीच्या इतिहासाची माहिती घ्यावी. संतांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती घ्यावी. म्हणजे समजेल की प्रत्येक संपादक हा स्वतंत्र भारताचा स्वाभिमानी व स्वावलंबी नागरीक आहे. ज्यांना नियोजन करून कठोर परिश्रम करण्याची जिद्द आहे अशा ककोणत्याही संपादकास हा समाज सन्मानाने जगवतो, वाढवतो. बांधीलकी फक्त समाजाशी हवी. पत्रकारीतेचे पावित्र्य जपून सामाजिक स्वाभिमान ठेवून कष्ट करणार्‍या महाराष्ट्रातील कोणत्याही संपादकास स्वावलंबी करण्याची हिंमत आमच्यामध्ये आहे. संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, मुंबई या संस्थेचे तेच खरे उद्दिष्ट आहे.
मुख्यमंत्री , मंत्री, आमदार हे आपले लोक प्रतिनिधी आहेत. मुख्यसचिव , सचिव, महासंचालक, संचालक, हे आपले नोकर आहेत. आपले अस्तित्व विसरल्याने लोकप्रतिनिधी दुर्लक्षीत करतात व सरकारी नोकर आपल्याला कचर्‍यासमान लेखतात. ही परिस्थिती बदलावयाची असेल तर साप्ताहिक संपादकांनो आपले दु:ख ज्यांना समजत नाही. आपल्या वरील अन्याय ज्यांना कळत नाही त्यांना आपल्या लेखणीच्या आसूडाने तडाखे द्या, मंत्रालयातील बोके, उंदीर, घुशी यांना बाहेर हाकलण्यासाठी त्यांचा भ्रष्टाचार अनाचार लेखणीने बाहेर काढा तरच तुम्हाला सन्माने मंत्रालयात प्रवेश मिळेल. तरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आपल्या अस्तित्वाची दखल घेतील. लोकसभा निवडणूकीची लढाई सुरू झाली आहे. आचारसंहिता काळात सरकारी जाहिराती बंद होतील मात्र निवडणूक उमेदवारंचे विशेषांक करून उत्पन्न वाढवा. लोकसभेनंतर लगेच विधानसभा निवडणूक आहे. राजकीय परिस्थिती म्हणजे काळू-बाळूचा तमाशा झाला आहे. स्वार्थासाठी, भीतीपोटी कोणकोणत्या पक्षात जातो व कोण कुणाचा गळा कापतो समजत नाही. कोणाची वासरे (लेकरे) कोणत्या गायीला पितात कळतच नाही. या अराजकसदृश्य परिस्थितीवर सडेतोड लेखन करा. मतदारांचे प्रबोधन, प्रशिक्षण करा, खर्‍यापायी माथा व खोट्याला लाथा मारून तुमची भूमीका स्पष्ट लिहा. तुमच्या लेखनीला समाज सलाम करील. लेखनीच्या धार व शब्दाचा अंगार निर्माण करून भ्रष्टाचार्‍यांना मारा जोडा व विकास कामास हात जोडा म्हणजे साप्ताहिक संपादक मालक त्याची ताकद समाजाला, शासनाला, प्रशासनाला कळल्याशिवाय रहाणार नाही.
साप्ताहिक वृत्तपत्र संपादकांना संघटीत करण्यासाठी आम्ही संपादक व पत्रकार सेवा संघ महाराट्र, मुंबई संस्थेच्या अंतर्गत साप्ताहिक संपादक राज्य परिषदेची निर्मिती करीत असून महाराष्ट्रातील साप्ताहिक संपादकांनी या राज्य परिषदेत सहभागी होऊन संघटन शक्ती वाढवावी. सोमवार दि. 25-03-2024 रोजी महाराष्ट्रातील संपादक-पत्रकारांसाठी राज्य व्हिडीओ कॉन्फरन्स बैठकीचे आयोजन केले असून या बैठकीत सहभागी व्हावे असे अवाहन करीत आहोत.
साप्ताहिक वृत्तपांवर या अन्याय करणार्‍या शासकीय धोरणात बदल करण्यासाठी, मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी व भ्रष्टाचारी अधिकार्‍यांना जाब विचारण्यासाठी साप्ताहिक वृत्तप संपादकांचे शिष्टमंडळ थेट मंत्रालयात आम्ही घेऊन जाणार आहोत. त्यापूर्वी नियमित साप्ताहीक प्रसिद्ध करणार्‍या कृतीशील संपादकांनी सक्रीय सहभाग नोंदवावा. जे येथील त्यांच्यासह व जे न येथील त्यांच्याशिवाय हा लढा, ही संघटन चळवळ यशस्वी करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.

किसन भाऊ हासे, संपादक
साप्ताहिक संगम संस्कृती, संगमनेर
अध्यक्ष, संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here