साडेतीन मुहुतपैिकी एक असा हा गुढीपाडव्याचा सण

0
213

गुढीपाडवा

साडेतीन मुहुतपैिकी एक असा हा गुढीपाडव्याचा सण आहे. हिंदू धर्मीयांच्या नव्या वर्षातील हा पहिला सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला येतो. वसंत ऋतूच्या चैत्रपालवीबरोबरच लोकांच्या मनात नवा उत्साह, नव्या आशाआकांक्षा फुलून येतात. गुढीपाडवा सुखासमाधानात साजरा केला की सारे वर्ष कसे सुखात, निर्विघ्नपणे पार पडते अशी भावना आहे.

भारतीय बहुसंख्य लोक या दिवशी आपल्या छोट्या-मोठ्या घराच्या दाराशी सडा रांगोळी घालून नववस्त्रांची, नवसंकल्पांची गुढी उभी करतातच. एक सरळ उंच वेताची काठी घेऊन वर तांब्या-पितळेचे लखलखीत भांडे पालथे घालून बांधतात. त्या टोकाशीच रेशमी वस्त्र, चोळखण किंवा नवी साड़ी, कडुनिंबाचे डहाळे, चाफ्याच्या फुलांची माळ आणि साखरेच्या गाठीची माळ लोंबती ठेऊन बांधतात हीच गुढी होय. गुढीला गंध-फुले वाहून गुळ खोबऱ्याचा, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवितात. संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी अक्षता, हळदकुंकू वाहून गुढी उतरवतात.

गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची पाने, मिरे, हिंग, साखर, जिरे, ओवा ठेचून खातात. या पदार्थामुळे उत्तम आरोग्य लाभते, बुद्धी तेजस्वी होते. घरोघरी पुरणपोळ्या वा अन्य गोडधोड पदार्थांचे जेवण एकत्र बसून करतात व आनंद लुटतात.

या सणाविषयी अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. प्रभु रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून, रावण- राक्षसांचा पराभव करून अयोध्या नगरीत प्रवेश केला तेव्हा लोकांनी मोठ्या आनंदाने गुढ्या तोरणे उभारून आपला आनंद व्यक्त केला तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली असे मानतात.

बसू नावाचा राजा तपश्चर्या करून मनुजेंद्र झाला व अमरेंद्राने या दिवशी वस्त्रालंकार देऊन गौरव केला तो हाच दिवस असे मानतात. शिवाय ब्रह्मदेवाने चैत्र शुद्ध प्रतिपदेस सृष्टी निर्माण केली असे म्हणतात.

फार वर्षापूर्वी पैठण म्हणजेच प्रतिष्ठानपूर ही महाराष्ट्राची राजधानी होती. तेथे शालिवाहन नावाचा शूर, पराक्रमी राजा होऊन गेला. त्याच्या राज्यावर राजा शकाने वेळोवेळी स्वारी करून लूट, अत्याचार केले. मग शालिवाहन राजाने स्वारी करून शकांचा पराभव केला तो हाच पाडव्याचा विजयदिन होय. या दिवसापासूनच शालिवाहन शक वर्षाची (इ.स. सुरू झाल्यावर ७८ वर्षानंतर) सुरुवात झाली. दक्षिण भारतात हाच वर्षारंभ मानतात.

या शुभदिनी, वर्षारंभी चांगल्या कामाची सुरुवात करावी, नवे संकल्प नव्या योजना आखाव्या. मागील वर्षाचा आढावा घेऊन नवीन ध्येय धोरणांचा, शुभकार्यांचा आरंभ करावा. या वेळी वसंत ऋतू सुरू होत असल्यामुळे, नव्या आशा-आकांक्षा, नवा उत्साह चैत्र पालवीबरोबर वाढविणारा वर्षाच्या सुरुवातीचा महत्त्वाचा सण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here