
विठ्ठलभक्तीच्या अभंगातून पुण्यस्मरणास भक्तिरसाची श्रद्धांजली
बारामती (प्रतिनिधी – साप्ताहिक भावनगरी) – “भजा रे विठ्ठला…” या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या माध्यमातून वारकरी परंपरेतील भक्तिरसाचे जणू झरेच वाहू लागले, आणि श्रोते त्या विठ्ठलनामात चिंब न्हाऊन गेले.
कै. सुशीला नारायण शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मयुरेश्वर आपारमेंट सहकार नगर, लाईन नं. ४, बारामती येथे आयोजित कीर्तनसेवा कार्यक्रम अध्यात्मिक वातावरणात आणि भक्तिभावाने पार पडला.
या कीर्तनसेवेचे आयोजन सा. भावनगरीचे संपादक संतोष शिंदे यांनी आपल्या मातोश्रींच्या स्मृतीप्रित्यर्थ भावपूर्ण श्रद्धेने केले होते.
सौ. भाग्यश्री भाग्यवंत यांचे कीर्तन ठरले विशेष आकर्षण
कार्यक्रमाला शनिवार, १२ जुलै रोजी सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. प्रारंभी बेलवाडी (ता. इंदापूर) येथील भजनी मंडळांनी भक्तिगीतांनी वातावरण भारून टाकले. त्यानंतर झी टॉकीज फेम अध्यात्मभूषण ह.भ.प. सौ. भाग्यश्री भाग्यवंत (आळंदी) यांनी संत तुकारामांच्या “भजा रे विठ्ठला” या अभंगावर चिंतनात्मक कीर्तन सादर केले. त्यांच्या प्रभावी वाणीने आणि भावनिक सादरीकरणाने उपस्थितांच्या अंतःकरणाला हात घातला.
गायन, मृदंग व टाळांच्या गजरात भक्तीमय वातावरण
कीर्तनसेवेच्या पार्श्वभूमीवर संगीत विशारद भागवत महाराज भाग्यवंत यांचे सुमधुर गायन आणि मृदंग विशारद पुरुषोत्तम महाराज पांचाळ यांच्या तालबद्ध मृदंगवादनाने भक्तिरसाची अनुभूती अधिक गहिरी केली. टाळ्यांच्या गजरात श्रोतेही विठ्ठलनामात एकरूप झाले.



प्रतिमेला पुष्पांजली, अश्रूंमधून आदरांजली
कार्यक्रमाच्या प्रारंभी कै. सुशीला शिंदे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कुटुंबीय, आप्तेष्ट, सहकारी, हितचिंतक आणि बारामतीतील विविध मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
विठोबाच्या भक्तीचा सोहळा, अंतर्मनात नांदणारी अनुभूती
“तुका म्हणे आण विठोबाचे” या संतवचनानुसार, हा कार्यक्रम केवळ श्रद्धांजली नव्हता, तर तो विठ्ठलभक्तीचा जिवंत अनुभव देणारा भक्तिसोहळा ठरला. उपस्थित प्रत्येक श्रोत्याच्या मनात अखेर ‘विठोबा रखुमाई’च्या नामाचा गजर निनादत राहिला.