शिवरायांना एखाद्या जातीत व धर्मात अडकवणे योग्य नाही – शशिकला गावडे
सांगली /प्रतिनिधी
छत्रपती शिवरायांचा लढा हा स्वराज्यासाठीचा होता तो धर्मासाठी नव्हता, म्हणूनच अठरापगड जाती व विविध धर्माचे लोक मावळे म्हणून शिवरायांच्या सोबत होते. ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती ही स्वराज्यासाठी दिली आहे. तेव्हा शिवरायांना एखाद्या जातीत व धर्मात अडकवणे योग्य नाही असे मत झलकारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष शशिकला गावडे यांनी व्यक्त केले.
झलकारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आरग यांच्या वतीने शिवजयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. छत्रपती शिवराय हे बहुजनांचे राजे आहेत. त्यांनी स्वराज्याची संकल्पना केवळ मांडली असे नाही तर ती सत्यात उतरवली. महिलांच्या न्याय हक्का करिता तसेच ज्ञाती बांधवांना स्वजातीत व स्वराज्यात परत घेताना धर्म मार्तंडांचा रोषही ओढवून घेतला होता. म्हणूनच शिवरायांचा आदर्श आपल्या अंगी बनवण्यासाठी, शिवचरित्रातून प्रेरणा घेण्यासाठी शिवजयंती घराघरात साजरी व्हायला हवी असेही मत त्यांनी व्यक्त केले.स्वागत अधिका बाबर यांनी केले तर आभार नंदिता खटावे यांनी मानले यावेळी सीमा पाटील, अश्विनी इंगळे, राजश्री चव्हाण, सुप्रिया चव्हाण, अक्षरा बाबर, पद्मसिंह बाबर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.