बारामतीत नऊ एकरांवर साकारणार सुंदर सेंट्रल पार्क…..
बारामती ; शहराच्या सौंदर्यात भर घालणारे व बारामतीकरांना चार क्षण निवांतपणे व्यतित करण्यासाठी भव्य सेंट्रल पार्कचे (मध्यवर्ती उद्यान) काम सुरु झाले आहे.
नऊ एकरांवर हे उद्यान साकारणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून हे उद्यान साकारत आहे.
बारामती शहराच्या मध्यवर्ती भागात बसस्थानक व प्रशासकीय भवनासह नव्याने होणा-या अतिरिक्त पोलिस अधीक्षक, बारामती शहर पोलिस स्थानक, नियोजित जीएसटी भवन व ग्रंथालय येथे येणा-यांना काही काळ थांबायचे असेल तर या पार्कमध्ये त्यांना निवांतपणे थांबता येईल.
परदेशाच्या धर्तीवर अत्यंत सुंदर असे हे पार्क साकारणार आहे.
पहाटे जॉगिंग, व्यायाम, योगासनांसह वर्कआऊट करणे, दुपारनंतर काही काळ निवांतपणे व्यतित करणे तर संध्याकाळी फिरण्यासह चटपटीत खाद्यपदार्थांवर ताव मारण्यासाठी लोक येथे येणार आहेत.
सध्या पार्कचे काम वेगाने सुरु आहे. मुंबईच्या अभिर आर्किटेक्ट कंपनीच्या स्मिता तावरे या उद्यानाचे लँडस्केपिंग व डिझाईनिंग करीत आहेत.
काय असेल या पार्कमध्ये…..
• पार्कला भव्य प्रवेशद्वार
• मध्यवर्ती ठिकाणी कारंजे
• सहा मीटर रुंदीचा पाथ वे
• काही सेल्फी पॉईंट व बसण्याची जागा
• फुलांची थीम गार्डन, सुंदर शिल्पांचा समावेश
• आठ मीटर उंचीचा मनोरा, तेथून संपूर्ण बाग पाहता येईल
• छोटेसे अँम्फी थिएटर, कार्यक्रम सादरीकरण बैठक व्यवस्था
• योगासनांसाठी स्वतंत्र योगाझोन
• इंद्रधनुष्याच्या रंगांचा रेनबो प्लाझा
• लहान मुलांसाठी खेळण्याचा स्वतंत्र विभाग
• ओपन फिटनेस एरिया
• 60 चार व 90 दुचाकी पार्कींगची सुविधा
• फूड ट्रक व स्टॉल्स मिळून 20 खाद्यपदार्थांचे स्टॉल्स
अजित पवारांकडून बारामतीकरांसाठी भेट…
सदरचे सेंटर पार्क हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना दिलेली एक भेट असेल.
वर्षभरात या पार्कचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असून या पार्कमुळे बारामतीच्या सौंदर्यात अधिकची भर पडेल. येथे रोजगारनिर्मितीही होईल व नागरिकांना चार क्षण निवांतपणे व्यतित करता येतील- सचिन सातव, अध्यक्ष, बारामती सहकारी बँक.