विनाअनुदानित शिक्षकाची आत्महत्या : एक चिंतन
युँ तो दुनिया मे सभी आते
है जीने के लिए,
मौत वो है जिसका करे
जमाना अफसोस।
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील एका विनाअनुदानित श्री गजेराम मुंडे निवासी विद्यालयामधील तरुण शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. तसेच विनाअनुदानित शिक्षकांच्या आणि विनाअनुदानित संस्थांच्या समस्या समोर आल्या. वास्तविक गेल्या १८ वर्षापासून विनाअनुदानित संस्थेवर काम करणारे धनंजय नागरगोजे यांना कोणताही पगार मिळाला नाही, आणि त्यामुळे ते नैराश्यात गेले. त्यांनी सुसाइड नोट लिहून आपले जीवन संपवले, एवढाच हा विषय नसून पूर्ण शिक्षण व्यवस्थेला एक प्रकारचे आव्हान आहे.
महाराष्ट्र शासनाने ८ मार्च २०१९ मध्ये अनुदान देण्याचे जाहीर केले होते. मात्र सहा वर्षे होऊनही अनुदान दिलेले नाही. त्यामुळे राज्यातील अनेक संस्थाचालक व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी नैराश्यमध्ये आहेत. महाराष्ट्र शासन घोषणा करते मात्र त्याची अंमलबजावणी करत नाही. याची अनेक उदाहरणे आपणास पहावयास मिळतात. मागे काही महिन्यांपूर्वी १ जून २०२४ पासून २० टक्क्याचे अनुदान असलेल्या शाळांना ४० टक्के अनुदान देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. मात्र त्याबाबतची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही.
विनाअनुदानित आश्रम शाळेतील शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या सुसाईड नोटवरून संस्थाचालक अध्यक्ष विक्रम मुंडे, सचिव अतुल मुंडे व इतर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. वास्तविक यांची चूक तरी किती? असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होऊ शकतो. शासनाने अनुदान दिले नाही म्हणून शिक्षकांना पगार नाही, तेव्हा जाहीर करुनही अनुदान न देणार्या अधिकार्यांवर, मंत्र्यांवर गुन्हा दाखल करायला नको का? असाही प्रश्न पडतो. मात्र शासनाकडून अनुदान आले नाही त्यामुळे चिडून जाऊन ‘शिक्षकाला तू फाशी घे', असे म्हणणे आणि त्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणे योग्य नाही. आणि याच कारणासाठी हा गुन्हा संस्थाचालकांवर दाखल करण्यात आला.
प्रत्यक्षात महाराष्ट्र शासनाचे शासकीय शिक्षण क्षेत्राकडे असलेले दुर्लक्ष, तसेच वेळोवेळी अनुदान न देणे, अनुदानाची टक्केवारी घोषित केल्याप्रमाणे वाढ न देणे, आणि संस्थाचालकांच्या समस्या न सोडविणे, शिक्षक समन्वय संघाच्या अनुदान पाहिजे या मागणीसाठीच्या आंदोलनाकडे दूर्लक्ष करणे, या सर्व प्रकारातून अशा घटना घडत आहेत. तर याउलट इतर खाजगी संस्था मात्र फोफावत आहे, त्या साधन संपन्न होत आहे, तेथेही खासगी शिक्षकांचे कमी पगारात जास्त कामाने हाल होत आहेत, हा भाग वेगळा.
नागरगोजे सरांच्या आत्महत्येने महाराष्ट्रात खळबळ उडाली मात्र ती काही दिवसच राहिली, कारण त्यानंतर काहींचा जीवन मरणाचा प्रश्न म्हणून औरंगजेबची कबर आणि नागपूरची दंगल या गोष्टी चर्चेत आल्या. आणि नागरगोजे सरांचे बलिदान बाजूला पडले. दरम्यान महाराष्ट्र राज्य मराठी विषय शिक्षक महासंघाच्या राज्य कार्याध्यक्षा डॉ. मनीषा रिठे यांची नागरगोजे सरांवरील ‘व्यवस्थेचा मीच बळी', म्हणून एक कविता सोशल मीडियावर जोमात व्हायरल झाली. आणि या कवितेने परत एक वेळ नागरगोजे सरांचे आत्महत्या प्रकरण शैक्षणिक वर्तुळात चर्चेत आणले. कवितेतील
‘मोडका तोडका होता,
आसेने त्या जपलेला,
बघा ना साहेब जरा,
संसार हा विझलेला’
या ओळींमधून भावनिक, हृदयद्रावक परिस्थीती मांडली. मात्र भावनाप्रधान असून राज्य चालत नाही ते चालते खोट्या व वेळ मारून नेणार्या आश्वासनांवर, असा समज व अनुभव असलेल्या राज्यकर्त्यांनी फारसे काही केले नाही.
नागरगोजे सरांची आत्महत्या ही लक्षवेधी आहे. त्यांना तीन वर्षाची मुलगी कु. श्रावणी असून त्यांची पत्नी आठ महिन्यांची गरोदर असताना केलेला हा प्रकार सहजच नाही तर अशी प्रचंड नैराश्याची स्थिती महाराष्ट्र राज्यातील हजारो शिक्षकांवर आहे. शासन नैराश्यातून काढण्यासाठी मोबाईल नंबर देते, समुपदेशन करते, वेगवेगळ्या योजना राबविते, मात्र विनाअनुदानित शिक्षक नैराश्यात गेले पाहिजे, याचीही तरतूद करते, असे वाटते.
शेवटी ज्ञानाचे दान करणार्या, भारताचे भविष्य घडविणार्या या विनाअनुदानीत शिक्षकांच्या भावनांबाबत एक शेर आठवतो…
पुछ लेते वो बस मिजाज मेरा,
कितना आसान था इलाज मेरा।
– – – – राजेश राजोरे
मो.नं. : ९८२२५९३९०३
rajeshrajore@gmail.com
खामगाव, जि. बुलडाणा.
(लेखक हे दैनिक देशोन्नतीच्या बुलडाणा आवृत्तीचे संपादक आहेत.)

