विद्यार्थ्यांनो, पुस्तके वाचा, स्वतःला सक्षम बनवा- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सल्ला
बारामती, दि.१३: “विद्यार्थ्यांनो, पुस्तके ही तुमची खरी मित्र असून ती विचार करायला शिकवतात, कल्पनाशक्तीला पंख देण्यासोबत नवीन जगाला जोडण्याचे काम करीत असतात, पुस्तकांमुळे व्यवहारिक ज्ञान वाढण्यासोबतच नवीन संधीचे दरवाजे उघडण्याचे कामदेखील होते, त्यामुळे अधिकाधिक पुस्तके वाचा आणि त्या माध्यमातून स्वतःला सक्षम बनवा”, असा मोलाचा सल्ला उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिला.
पंचायत समिती सभागृहात येथे आयोजित आरोग्य विभाग व रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने विद्यार्थ्यांना चष्मे आणि पुस्तक वाटप कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गट विकास अधिकारी अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक राजीव मेहता, डॉ.संतोष भोसले आदी उपस्थित होते

श्री. पवार म्हणाले, पालकांचा पाठिंबा, विद्यार्थ्यांची इच्छाशक्ती आणि शिक्षकांचे महत्वपूर्ण योगदान यामुळे यशाचे शिखर गाठण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांच्या इच्छाशक्तींवर विश्वास दाखवून त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. विद्यार्थ्यांनीही ध्येय गाठण्याकरिता प्रचंड मेहनत आणि स्वतःला समर्पित केले पाहिजे. शिक्षकांनी काळानुरुप अद्ययावत ज्ञान देत मुलांचे भविष्य उज्ज्वल केले पाहिजे. यामाध्यमातून भारत देश महासत्ता होण्याकरीता उद्याची सक्षम पिढी घडविण्याचे काम करावे.

समाजातील गरजू व्यक्तीला लाभ देण्याचा प्रयत्न
समाजातील गरजू व्यक्तीला लाभापासून आर्थिक बाबीमुळे वंचित राहू नये, याकरीता विविध सामाजिक संस्थेची मदत घेवून काम करण्यात येत आहे. बारामती तालुक्यातील आरोग्य विभागामार्फत ३० हजार विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली, यामधून १ हजार ५१२ विद्यार्थ्यांना दृष्टीदोष आढळून आला. त्या सर्व विद्यार्थ्यांना रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून उच्च प्रतीचे चष्मे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या अंगी वाचनाची गोडी निर्माण व्हावी याकरिता जिल्हा परिषद व शासकीय अनुदानित शाळांना ५० हजार पुस्तके देण्यात येणार आहेत. दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो, अशांना या चष्म्यामुळे सुलभ पद्धतीने शिक्षण घेता येणार आहे. चष्मे आणि पुस्तकांकडे साधने म्हणून न बघता यशाची पहिली पायरी म्हणून पहावे. याचा उपयोग करुन तुमच्या स्वप्नांना साकार करण्याचा प्रयत्न करा, असेही आवाहन त्यांनी केले.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत बारामती येथे २३ कोटी ५० लाख रुपयांचे अत्याधुनिक ग्रंथालय उभारण्यात येत आहे. याचा बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड, फलटण या तालुक्यातील विद्यार्थी, नागरिकांना लाभ होणार आहे, त्यामुळे रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टने पुस्तके दान करण्याची सूचना श्री. पवार यांनी केली.

श्री. मेहता यांनी मनोगत व्यक्त केले व डॉ. खोमणे यांनी प्रास्ताविक केले.
