“लिनेस क्लब ऑफ बारामती”तर्फे आश्रम शाळेत महिला दिन साजरा: विद्यार्थ्यांसाठी आरोग्य, स्वच्छता आणि संरक्षण विषयक उपक्रम राबविले
एकशिव, ता. माळशिरस, जि. सोलापूर | 8 मार्च 2025
जागतिक महिला दिनानिमित्त “ऑल इंडिया लिनेस क्लब ऑफ बारामती” तर्फे गोविंद प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा, एकशिव येथे महिला दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य, स्वच्छता, आहार आणि संरक्षण विषयक महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. हर्षा जाधव यांच्या आरोग्य, स्वच्छता आणि आहाराविषयीच्या उपयुक्त मार्गदर्शनाने झाली. त्यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन स्वच्छतेचे महत्त्व समजावले आणि निरोगी राहण्यासाठी आवश्यक सल्ले दिले. यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला टूथ ब्रश, बेस्ट आणि खाऊचे वाटप करण्यात आले.
यानंतर इयत्ता पाचवी ते दहावीच्या मुलींसाठी “गुड टच-बॅड टच” या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर लिनेस विजया कदम यांनी सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी मुलींना आत्मसुरक्षेबाबत जागरूक राहण्याचा संदेश दिला.

जाचक मामी यांनी महिला दिनाचे महत्त्व विशद केले, तर धनश्री गांधी यांनी लिनेस क्लबच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी “लिनेस क्लब ऑफ बारामती”च्या अध्यक्षा उज्वला शिंदे होत्या. आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य व संरक्षण विषयक महत्त्व पटवून दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे पालन करण्याचा आणि मुलींना स्वतःच्या संरक्षणासाठी सजग राहण्याचा सल्ला दिला.

या कार्यक्रमात क्लबच्या धनश्री गांधी, सुमन जाचक, उल्का जाचक, मनीषा खेडेकर, विजया कदम, विजया तावरे, संध्या सस्ते यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमास आश्रम शाळेचे मुख्याध्यापक शेख सर, शिक्षक वृंद, एकशिव गावच्या महिला सरपंच, आशा वर्कर्स, महिला ग्रामस्थ आणि पालक उपस्थित होते.
सूत्रसंचालन कविता पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन जगताप मॅडम यांनी केले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य व स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण झाली असून, मुलींमध्ये आत्मसुरक्षेबाबत नवचेतना निर्माण झाली आहे.