लघुउद्योगांना संरक्षण विभागात मोठी व्यावसायिक संधी – धनंजय जामदार
केंद्र शासन आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत आयात पर्यायी (Import Substitute ) उत्पादने विकसित करण्यासाठी स्वदेशी कंपन्यांना विशेषतः लघुउद्योगांना प्रोत्साहन देण्याचे धोरण राबवत असून संरक्षण विभाग यासाठी विशेष प्रयत्न करत आहे. यामुळे पुरवठादार म्हणून लघुउद्योगांना मोठी व्यवसायिक संधी उपलब्ध झाली असून उद्योजकांनी या नवीन क्षेत्राचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे असे आवाहन बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी केले आहे.
म्युनिशंस इंडिया लिमिटेड या केंद्र शासनांतर्गत संरक्षण विभागाच्या कंपनीने पुणे ऑटो क्लस्टर येथे एम एस एम ई काँकलेव कार्यक्रमात संरक्षण विभागास मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असणाऱ्या सुट्या भागांचे प्रदर्शन आयोजित केले होते त्यास बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, सचिव अनंत अवचट, खजिनदार अंबिरशाह शेख वकील व संचालक हरीश खाडे यांनी भेट देऊन सविस्तर माहिती घेतली व संरक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या माध्यमातून बारामती एमआयडीसी व परिसरातील लघुउद्योगांना मोठ्या खाजगी कंपन्यांबरोबरच केंद्र शासनाचे संरक्षण, रेल्वे, पेट्रोलियम आदी विभागांची कामे मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत असलेची माहिती अध्यक्ष धनंजय जामदार यांनी दिली.