रोटरी क्लब ऑफ बारामती तर्फे ई-लार्निंग किट, लॉथ वेंडिंग मशीन, सॅनिटरी पॅड्सचे वाटप
बारामती: रोटरी क्लब ऑफ बारामती यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. या विशेष वर्षानिमित्त रोटरी क्लब विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. रोटरी क्लब ऑफ बारामती तर्फे दि. २० जून रोजी १२ इ-लार्निंग किट, ३ क्लॉथ बॅग वेंडिंग मशीन तसेच महिलांसाठी १ लाख २० हजार बायोडिग्रेडेबल सॅनिटरी पॅड्सचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून संसदरत्न खासदार सौ. सुप्रिया सुळे यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमास डिस्ट्रिक्ट डायरेक्टर एनव्हायरमेंट रो. संतोष परदेशी, बा.न.पा.मा. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे ह्याही उपस्थित होत्या.
कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे यांनी पर्यावरणात बदल घडवण्यासाठी आपण स्वतःपासून सुरुवात करणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्लास्टिक रिसायकलिंग होण्यासाठी आणि समाजातील प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. “आपण सर्वांनी एकत्र येऊन पर्यावरणाचा तापमान १ अंश सेल्सियसने कमी करण्यासाठी प्रयत्न केला तरी खूप मोठे काम होईल, पण त्यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज आहे,” असे त्यांनी सांगितले. तसेच, नागरिकांच्या काहीही सूचना असल्यास त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा, असेही त्यांनी नमूद केले.
बारामती परिसरातील महिला हॉस्पिटल, महिला वसतिगृह, शाळा, कॉलेज, नगर पालिका कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर्स, महिला बचत गट आदींना १ लाख २० हजार बायोडिग्रेडेबल सॅनिटरी पॅड्सचे वाटप करण्यात आले. बारामती नगर पालिकेच्या शाळा क्रमांक १ ते ८ तसेच न्यू इंग्लिश मीडियम स्कूल लोणी भापकर, संजय सूर्यवंशी सार्वजनिक वाचनालय, कृष्णाई इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल यांना इ-लार्निंग किटचे वाटप करण्यात आले. ३ क्लॉथ बॅग वेंडिंग मशीन बारामती नगर पालिकेला हस्तांतरित करण्यात आले. सदर वेंडिंग मशीन बाजारपेठेत लावण्यात येणार असून, १० रुपयात १ कापडी पिशवी विकत घेता येणार आहे. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या लोकांना ही सोय उपयुक्त ठरेल आणि पर्यावरणाचा फायदा होईल. “रोटरी क्लब ऑफ बारामतीचे काम खरोखर कौतुकास्पद आहे,” असे खा. सुप्रिया सुळे यांनी नमूद केले. यापूर्वी रोटरी क्लब तर्फे महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले होते. त्या महिलांनी त्याचा फायदा घेत कापडी पिशव्या तयार केल्या आहेत, त्याचे अनावरण देखील यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरीच्या अध्यक्षा सौ. दर्शना गुजर यांनी केले, तर सूत्रसंचालन अॅड. अक्षय महाडिक यांनी केले. कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे फार ईस्टचे पंकज पटेल, निम्मी पटेल, मेहुल चिमठणकर तसेच रोटरी क्लब ऑफ बारामतीचे सचिव अभिजीत बर्गे, कौशल शहा, अरविंद गरगटे, मल्लिकार्जुन हिरेमठ, हर्षवर्धन पाटील, अलिअसगर बारामतीवाला, मेहुल दोशी, किशोर मेहता, निखिल मुथा, स्वप्नील मुथा, हनुमंत पाटील, प्रतीक दोशी, प्रीती पाटील, जयश्री पाटील, अँस निसरीन बारामतीवाला, प्रियांका बर्गे, श्रद्धा महाडिक, माधुरी गानबोटे, अनुजा गरगटे, पद्मजा फरसोले, सुचेता वडूजकर आदी उपस्थित होते.
- दर्शना गुजर
(अध्यक्षा, बारामती रोटरी क्लब)