राष्ट्रीय एकता : प्रयत्न कोण, कसे करणार ?

0
210

राष्ट्रीय एकता : प्रयत्न कोण, कसे करणार ?

अब तो मजहब कोई
ऐसा भी चलाया जाए
जिस में इंसान को
इंसान बनाया जाए…

          आज ३१ ऑक्टोबर. राष्ट्रीय एकता दिवस. हा दिवस लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जयंती दिवस स्मृतित रहावा म्हणून साजरा करण्याचा निर्णय भाजपा सरकारकडून २०१४ पासून घेतल्या गेला. वल्लभभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी गुजरातमध्ये करमसंद या गावी झाला. गुजरातमध्ये खेडा, बोरसाड आणि बारडोली येथे शेतकर्‍यांची चळवळ त्यांनी उभारली होती व ब्रिटिश राजवटीविरुध्द ‘चले जाव’ आंदोलन प्रभावी केले.
          भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातील सुमारे ५६५ संस्थानात राजे-महाराजांचा स्वतंत्र कारभार चालत होता. परंतु सरदार पटेल यांनी या संस्थानांचे भारतात यशस्वी विलिनीकरण घडवून आणले. त्यामुळे देशाचे अनेक तुकड्यात विभाजन होण्याचे टाळण्यात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा सिंहाचा वाटा आहे. या योगदानाविषयी जनजागृती निर्माण व्हावी. ‘राष्ट्रीय एकता दिवस’ हा एक लोकप्रिय चळवळ व्हावी, या उद्देशाने ‘राष्ट्रीय एकता दिवस’ साजरा केला जातो. एकतेसाठी दौड, शपथ ग्रहण, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर उपक्रम राबविले जातात. तसा हा दिवस लोह महिला (आयर्न लेडीं) म्हणून सुपरिचीत  पंतप्रधान इंदिराजी गांधी यांचा स्मृती दिवस ही आहे. सन १९८४ मध्ये त्यांची सुरक्षा रक्षकांकरवी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
     भारत हे एक विशाल आणि वैविध्यपूर्ण राष्ट्र आहे. भारताच्या ओळखीमध्ये विविध जाती, धर्म, समुदाय, संस्कृती आदिंचा समावेश होतो तर राष्ट्रीय एकता ही भावना जोपासून ‘आपण सारे एक आहोत’, असे म्हणत मजबूत राष्ट्र बनते. येथील संस्कृती बंधुत्व वाढविणारी आहे. दरम्यान ही भावना वाढविण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता परिषद १९६१ साली स्थापन करण्यात आली आहे. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी एकजुटीने लढा देणे, देशाची प्रगती साधण्यासाठी एकत्र संघर्ष करणे, वंश, जात, धर्म, संस्कृती व भाषा यामध्ये भिन्नता असून सुध्दा ‘आपण सारे एक आहोत’, देशातील नागरिकांमध्ये एकता आणि बंधुत्वाची ही भावना आहे. ही भावना आपल्या राष्ट्रीय एकात्मतेला कारणीभूत आहे. तर या उलट जम्मू कश्मिरचा व पंजाबमधील आतंकवाद, नäक्षलवाद, वाढता धर्मवाद, जातीयवाद, आरक्षण वाद, श्रीमंत-गरीब यांच्यातील वाढती दरी यामुळे राष्ट्रीय एकात्मता संकटात आहे.
   राजकारणात गठ्ठा मतदान मिळावे म्हणून केल्या जाणारे लांगुलचालन, फुकटच्या योजना, टॅक्स देणार्‍यांना सोई सवलती न देता चोर ठरविण्याचा प्रकार, ठराविक उद्योगपतींना कर्ज माफी व विशिष्ट सवलती, यामुळे सरकारप्रती सोबतच इतर जाती, वर्ग बाबतीत एकमेकांच्या भावना बदलत आहेत. बंधुत्वची भावना संपुष्टात येत आहे. सरकार व कायदे हे भेदभाव करतात, प्रांतवाद व भाषावाद वाढत असल्याने तसेच राजकारणात मनी, मसल्स व मीडिया (पैसा, गुंडगीरी व प्रसिध्दी माध्यमे) च्या माध्यमाने होणारे सर्व प्रकार नागरिकांमध्ये असुरक्षितता वाढवितात. त्यामुळे नागरिकांमध्ये पडणारी फूट हे सर्व राष्ट्रीय एकतेला घातक ठरते. तेव्हा स्वार्थी घटकांना ओळखून त्यांचेविरुध्द कारवाई झाली पाहिजे.
      देशाची एकता, एकात्मता आणि सुरक्षा सक्षम करण्यासाठी आणि अबाधित राखण्यासाठी सरकारची वचनबध्दता अधोरेखीत करण्याच्या दृष्टीने ‘राष्ट्रीय एकता दिवस’ विविध उपक्रमांनी साजरा करणे हा भाग वेगळा तर आपलेच सरकार पुन्हा-पुन्हा निवडून यावे यासाठी घेतले जाणारे लोकप्रिय निर्णय व केले जाणारे तृष्टिकरणाचे काम, यातून राष्ट्रीय एकता संकटात येत नाही ना?  हे तपासणे जास्त महत्त्वाचे ठरते.
            भारतात सर्व लोक गुण्यागोविंदाने रहावे, राष्ट्रीय एकताची भावना वाढावी यासाठी विविधतेचा सन्मान करीत नागरिकांनी क्षुल्लक भांडणे विसरली पाहिजेत. धर्म, जात, भाषा, प्रांत या सर्वांचा विचार सोडून देशातील सर्व नागरिकांनी आपण एकच आहोत, असा विचार केला पाहिजे, तरच भारतात राष्ट्रीय एकात्मता वाढेल मात्र असे करणे आता तेव्हढे सोपे नाही, हे पण तेवढेच खरे!  तेव्हा राष्ट्रीय एकतासाठी प्रयत्न कोण, कसे करणार? याबाबत स्पष्टता दिसून येत नाही. सर्वांची म्हणजे कुणाचीही जबाबदारी नाही असे वागल्या जाते. तेव्हा असा प्रश्न उपस्थित होतो.
            शेवटी ‘प्रत्येक व्यक्ती राष्ट्रासाठी आहे, राष्ट्र व्यक्तिसाठी नाही’, या दृष्टीने नागरिकांमध्ये आपापसात प्रेम भावना, बंधुत्वाची भावना आवश्यक ठरते. या आशयाचा शेर आठवतो...

सात संदूकों में भरकर दफ्न कर दो नफरतें,
आज इंसाँ को मोहब्बत की जरुरत है बहुत।
— राजेश राजोरे
मो.नं. : ९८२२५९३९०३
rajeshrajore@gmail.com
खामगाव, जि. बुलडाणा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here