राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शासकीय सेवेत घेण्याबाबतचे निकष मंत्रिमंडळ बैठकीत निश्चित :-उपमुख्यमंत्री अजित पवार

0
73

दि. २९ जून २०२४
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना
शासकीय सेवेत घेण्याबाबतचे निकष मंत्रिमंडळ बैठकीत निश्चित

कोणताही खेळाडू शासकीय सेवेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी
आवश्यकता असल्यास निकषांमध्ये आणखी मुद्द्यांची भर घालण्यात येणार
– उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

मुंबई, दि. २९ :- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करून महाराष्ट्राचा नावलौकिक वाढविण्याऱ्या खेळाडूंना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार शासकीय नोकरी देण्याचा, त्यासाठीचे निकष निश्चित करण्याबाबतचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचाविणारा कोणताही खेळाडू या निर्णयाच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी आवश्यकता असल्यास निकषांमध्ये आणखी मुद्द्यांची भर घालण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पॉईंट ऑफ इन्फर्मेशनच्या माध्यमातून सदस्य हिरामन खोसकर यांच्याकडून खेळाडू कविता राऊत हिला उपजिल्हाधिकारी किंवा जिल्हा उपअधीक्षक पदावर नोकरी देण्याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यासंदर्भात माहिती दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, राज्यातील विविध खेळांना, खेळाडूंना शासनाकडून नेहमीच प्रोत्साहन देण्यात येत आहे. ज्या खेळाडूंनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करून, पदक प्राप्त करून राज्याचा लौकिक वाढविला आहे, त्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. त्याचे निकषही निश्चित करण्यात आले आहेत. सभागृहातील सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन या निकषांमध्ये आणखी काही मुद्द्यांचा भर घालण्याबाबत निश्चित विचार करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
——-०००-

दि. २९ जून २०२४
आर्थिक सहाय्याच्या योजनांचे पैसे महिन्याच्या ५ तारखेला
लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात येणार
– उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

मुंबई, दि. २९ :- राज्यातील सर्वसामान्य, वंचित-उपेक्षित, आर्थिक दुर्बल घटकांसाठी शासनाने विविध योजना सुरु केल्या आहेत. पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ वेळीच मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग बांधवांसाठीच्या योजनांसह सर्वच विशेष सहाय्याच्या योजनांचे पैसे प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पॉईंट ऑफ इन्फर्मेशनच्या माध्यमातून सदस्य बच्चू कडू यांच्याकडून दुर्बल घटकांना वेळेवर आर्थिक सहाय्य मिळत नसल्याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांसंदर्भात माहिती दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, अधिवेशनातील आजच्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर वित्त विभागाच्या सचिवांशी चर्चा करून याबाबतच्या वस्तुस्थितीची माहिती घेण्यात येईल. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग बांधवांसाठीच्या योजनांसह सर्वच विशेष सहाय्याच्या योजनांसाठी राज्य शासनाने निधीची भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे या योजनांमधून मिळणारे आर्थिक सहाय्य वेळेवर लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणे गरजेचे आहे. आर्थिक योजनांच्या सर्वच योजनांचे पैसे लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला मिळण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
——-०००—–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here