राम मंदिर बनाने कासपना पुरा हुवा,पर इंसान बनने-बनाने कासपना अभी अधूरा है…

राम मंदिर बनाने का सपना पुरा हुवा, पर इंसान बनने-बनाने का सपना अभी अधूरा है…

0
136

भारतातील ५ वे धाम ‘अयोध्या धाम’!

राम मंदिर बनाने का
सपना पुरा हुवा,
पर इंसान बनने-बनाने का
सपना अभी अधूरा है…

भारत हा कृषीप्रधान देश आहे, तसाच धर्म प्रधान देश आहे. भारतात चार दिशेने असलेले चार धाम व एकूण १२ ज्योतिर्लिंग मंदिरे धर्माचे आस्थेचे प्रतिक आहेत. चार धाम यात्रा हे प्रत्येक धार्मिक हिंदूचे ध्येय असते. भारताच्या पूर्वेला श्री जगन्नाथ धाम (जगन्नाथ पुरी), पश्चिमेला व्दारिका धाम (व्दारका बेट), उत्तरेला बद्रीनाथ धाम (उत्तराखंड) तर दक्षिणेला रामेश्वरम् धाम आहे. या चार धाम मध्ये आता पाचव्या धामची भर पडली आहे. ती म्हणजे ‘अयोध्याधाम’ या रामजन्मभूमी स्थळाची. नवा अध्याय-अयोध्या, असे म्हणत अयोध्या धाम हे संपूर्ण भारतात पाचवे धाम म्हणून मान्यतेला जाणार आहे. तर आगामी काळात सहावे धाम म्हणून मथुरा धाम (श्रीकृष्ण जन्मभूमि) झाल्यास नवल वाटू नये.
अयोध्येला श्रीराम जन्मभूमीच्या ठिकाणी अखेर भव्य दिव्य राममंदिर निर्माण झाले, नव्हे सोमवारी श्रीरामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाली. ऐतिहासीक घटना व सोहळा म्हणून याची नोंद झाली आहे. अयोध्या धाम जसे नामकरण झाले तशी सुविधा, व्यवस्थाही होत आहे. नविन अयोध्या धाम रेल्वेस्टेशन, आंतरराष्ट्रीय विमानतळ, हॉटेल्स, धर्मशाळा, शरयू नदी घाट, २९० श्रीराम स्तंभ, असे हजारो कोटी रुपये खर्चाचे प्रकल्प तेथे साकारले आहे. राम जन्मभूमिचे स्थळ म्हणून अयोध्येला महत्त्व होतेच मात्र आता खर्‍या अर्थाने अयोध्या धाम अस्तित्वात आले आहे. केंद्रसरकार व उत्तरप्रदेश सरकारने संयुक्तपणे हजारो कोटी रुपये खर्च करुन अयोध्या धाम हे धार्मिक पर्यटन स्थळ म्हणूनही समोर आणले आहे. तर भाजपा पक्षाच्या जाहीरनाम्यात नमूद प्रमाणे ‘मंदिर वही बनाऐंगे’ शब्द पूर्ण केले आहे. तसेच या सोबतच रामजन्मभूमीचा संघर्ष यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. रामजन्मभूमिच्या मुद्द्याला उचलणे, त्याला देशवासीयांचा आत्मियतेचा, जिव्हाळ्याचा विषय बनविणे, रथयात्रा ते कारसेवा पासून संघर्ष उभा करणे, जाहिरनाम्यात जाहीर करणे आणि आता त्या संकल्पाची पूर्तता करणे, असा प्रवास पूर्ण झाला आहे.
राम मंदिर निर्माणसाठी श्री राम जन्मभूमि ट्रस्टने अकराशे कोटी गोळा करण्याचे आवाहन करणे, प्रत्यक्षात बत्तीसशे कोटी जमा होणे, त्याचे व्याजातूनच मंदिराच्या पहिल्या माळ्याचे बांधकाम होणे, हे सर्व चमत्कार देव-धर्माच्या नावानेच या देशात होऊ शकतात, तेव्हढी धार्मिकता, आस्था, श्रध्दा व विश्वास जनतेत आहे, हे पुन्हा अयोध्या धाम ने स्पष्ट झाले आहे. अनेक धमार्थ संस्थांनी धर्मशाळा, यात्री निवास उभारण्यासाठी अयोध्येत जागा घेतली असून आगामी काळात अयोध्या धाम केल्याशिवाय हिंदूंची व चारधामयात्रा पूर्ण होणार नाही, अशी मान्यता राहणार, हे पण देशातील आताचा उत्साह पाहता स्पष्ट झाले आहे.
अयोध्येत रामजन्मभूमी मंदिर व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमित्ताने देशभरात रामभक्तांची संख्या वाढली असून हजारो रामकथा व व्याख्याने कार्यक्रम झालीत. तसेही भारतीय व्यक्ती आणि राम यांचे अतूट नाते असून प्रत्येक बर्‍या वाईट प्रकारात रामाची आठवण केली जाते. मनाची अवस्था जशी असेल त्या अवस्थेत रामाचे नाव आपुसकच तोंडात येण्याची व तसे म्हणण्याची पध्दत आहे.
मनुष्य दु:खात असतांना ‘हे राम’, त्रासात असताना ‘अरे राम’, लज्जा स्थितीत ‘हाय राम’, अशुभ कार्यात ‘अरे, राम-राम’, अभिवादन करतांना ‘राम-राम’, अज्ञानाचे वेळी ‘रामाला माहित’, अनिश्चित अवस्थेत, ‘राम भरोसे’, अचूकतेसाठी ‘राम बाण’, तसेच सुशासनसाठी ‘राम राज्य’, तर मृत्यूसाठी ‘राम नाम सत्य’, तसेच अनेक ठिकाणी ‘राम’ नावाची साद वेळोवेळी घातली जाते. म्हणूनच रामजन्मभूमीला विशेष महत्त्व आहे.
संपूर्ण भारतच नव्हे तर अनेक देशातील अनेक चौकात राममय वातावरण बनविणे, हा राजकारणाचा भाग आहे, असे म्हटले तरी या निमित्ताने पुन्हा एकवेळ रामायणातील सर्व आदर्श व्यक्तिमत्वाचे गुणांना उजाळा मिळाला, प्रेरणा मिळाली, आणि राम राज्यातील नैतिक मुल्यांची पुनर्स्थापना करण्यासाठीचे चिंतन मिळाले आहे. एवढे मात्र खरे!
शेवटी ‘सरकारच्या आले मना, तेथे कोणाची चालेना’ हे रामजन्मभूमी मंदिर निमित्ताने पुन्हा सिध्द झाले. नवीन ‘अयोध्या धाम’ सर्वांसाठी सर्व अर्थाने बोध देणारे, सकारात्मकता दर्शविणारे, प्रेरणा देणारे, धार्मिक पर्यटन वाढविणारे, रोजगार निर्मितीचे व अर्थव्यवस्थेला चालना देणारे तसेच रामराज्य अर्थात सुराज्यासाठी प्रेरणा देणारे एक ‘धाम’ ठरेल, अशी अपेक्षा करु या.
शेवटी सद्यस्थिती दर्शविणारा एक शेर आठवतो…
हे राम, कहाँ यह समय
कहाँ तुम्हारा त्रेता युग,
कहाँ तुम मर्यादा पुरुषोत्तम
और कहाँ यह नेता युग।

           *- - - राजेश राजोरे*
       मो.नं. : ९८२२५९३९०३

rajeshrajore@gmail.com
खामगाव, जि. बुलडाणा.
(लेखक हे दैनिक देशोन्नतीच्या बुलडाणा आवृत्तीचे संपादक आहेत.)
दिनांक -23/1/24.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here