राधा कृष्ण
कृष्णा….
तुझा गहिरा निळा रंग
काळजात उतरलाय खोलवर
आणि आकाशात ही…
तुझी साथ..तुझी सोबत
तुझी बासरी..तुझं मोरपीस
आठवत राहतोस रे आख्खा तू…
राधेच्या पैंजणासारखा…
तुझं सगळंच कसं
अगदी जगावेगळं!
जन्मलास मथुरेत
आणि वाढलास गोकुळात.
किती छेडलस गोपीकांना
भर बाजारात ..वनांत..
अन् भलत्या वयात..
कृष्णा…या अल्लड प्रेमात
वासना नव्हती रे कुठंच…
असं हे निखळ मैत्रीचं प्रेम
द्रौपदीला बहाल करुन
बाईचं जगणं सुंदर केलंस..
वस्त्र पूरवून तू त्या वेळी
बाईचं विवस्त्रपण झाकलस..
कृष्णा… येशील का रे परत तू?
म्हणाला होतास नं!
यदा यदा ही धर्मस्य
ग्लानिर्भवती भारत…
मग?
येशील नं पुन्हा… तसाच
बासरी घेऊन.
राधा आजही वाट पहातेय रे
तुझी…
पायी पैंजण घालून..
कृष्णा…कसलं रे नितळ प्रेम हे!
रुक्मिणी चा होऊन सुध्दा
राधेचा शाम झालास..
प्रेमापायी मीरेनं विषाचा
प्याला रिता केला…
पण .. एक सांगू कृष्णा…
या वासनांध दुनियेत
आता पुन्हा कृष्ण होणे नाही…
म्हणूनच वाटतंय
कृष्णा… येशील का रे पुन्हा… जगाला प्रेम शिकवण्यासाठी…
✍🏻©️ अंजली राठोड श्रीवास्तव करमाळा.
(लेखिका वक्ता आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत.)