
राज्यस्तरीय अभिरुप परीक्षा गुणगौरव सोहळा बारामतीत उत्साहात पार पडला….!
बारामती, ता. २५ जुलै २०२५:
भारतीय राज्यस्तरीय अभिरुप परीक्षा – २०२५ चे गुणगौरव सोहळा नुकताच बारामती केंद्रावर उत्साहात पार पडला. या प्रेरणादायी सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आदर्श शिक्षक श्री लक्ष्मण जगताप सर होते. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले UPSC टॉपर आणि सध्या कार्यरत IPS अधिकारी अभिजीत चौधर, ज्यांनी आपल्या यशाचा प्रवास विद्यार्थ्यांपुढे मांडून उपस्थितांचे मन जिंकले.
कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली ती आरोग्य विभागाचे माजी सभापती सुरज शेठ सातव, सक्सेस कोड अकॅडमीचे संचालक अण्णासो भुजबळ सर, फलटण येथील श्री क्लासेसचे संचालक श्रीकांत साळुंखे सर, द परफेक्ट अकॅडमीचे संचालक भोसले सर, माजी मुख्याध्यापक काटे सर व सौ. उज्वला जाधव मॅडम यांची. याशिवाय परीक्षा दिलेले सर्व गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





श्री लक्ष्मण जगताप सरांनी आपल्या भाषणात सांगितले की, “विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल, तर त्यांच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची संकल्पना भक्कम असावी लागते. पायाभूत अभ्यासक्रम समजून घेतल्यासच मोठ्या स्पर्धांमध्ये टिकता येते.” त्यांनी पालकांना देखील आवाहन केले की ते आपल्या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावं.
अभिजीत चौधर यांनी आपल्या संमभाषणातून NMMS, NTSE यांसारख्या स्पर्धा परीक्षांनी आपल्या कारकिर्दीला कशी दिशा दिली हे उलगडून सांगितले. “मराठी माध्यमातून शिकूनही, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास कोणतीही शिखरं गाठता येतात,” असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
साळुंखे सरांनी प्रत्येक विद्यार्थ्याने दररोज फक्त अर्धा तास स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला तरी मोठा फरक पडतो, असा कानमंत्र दिला. परीक्षेचे पारदर्शक नियोजन, अभ्यासपद्धती आणि अभ्यासक्रमाचे शास्त्रीय नियोजन याविषयी त्यांनी विशेष उल्लेख केला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. एकूण १३०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यातील
१५ विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार,
२५ जणांना जिल्हास्तरीय पुरस्कार,
११५ विद्यार्थ्यांना तालुकास्तरीय गौरव,
तर
BDS विभागात ५ गोल्ड, ३ सिल्वर आणि १५ ब्रॉन्झ मेडल प्रदान करण्यात आले.
विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, ट्रॉफी आणि स्कॉलरशिप देऊन सन्मानित करण्यात आले. सोहळा हा विद्यार्थ्यांसाठी केवळ पुरस्कारांचा नव्हे, तर पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देणारा ठरला.