राजकारणात अपशब्दांचा वापर…

0
239

राजकारणात अपशब्दांचा वापर…

शब्द शक्ती है, शब्द भाव है,
शब्द सदा अनमोल,
शब्द बनाये शब्द बिगाडे
तोल मोल के बोल..


महाराष्ट्राची राजकीय संस्कृती पार बघडली आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे अनेक धुरंधर कारणीभूत आहेत. ते बोलतांना तोंडावर, शब्दांवर नियंत्रण ठेवता येत नाहीत. सभागृहात, बाहेर जाहीर कार्यक्रमात, सभेत तसेच माध्यमांसमोर बोलतांना आपण कोणासाठी कोणते शब्द बोलत आहोत, यातून ‘संदेश’ काय जाईल किंवा या बोलण्याचे काय परिणाम होतील, याची पर्वा ते करीत नाहीत. अनेकवेळा तर त्यांचे ते बोलणे मुद्दामहून ठरविल्याप्रमाणे प्रसिध्दीसाठी किंवा जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी असावे, असेही वाटते. दुसरीकडे बोलण्याचे तारतम्य बाबत त्या-त्या पक्षाचे वरिष्ठ आक्रमक होत नाहीत. तेव्हा हे कसे थांबणार? हा प्रश्न उपस्थित होतो.

राज्य घटनेचे कलम १९, ३ नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे, त्याचा आधार घेत काही पण बोलायचे, कसेही आरोप करायचे, असे सर्रास सुरु आहे. यामध्ये सर्व पक्षाचे राजकीय नेते ‘एक से बढकर एक,’ असे आहेत. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राचे राजकारण, त्यातील भाषा, आरोप, प्रत्यारोप आणि शिवराळ वक्तव्य व अपशब्द यामुळे ढवळून निघत आहे. अनेक चॅनल्स वृत्तपत्रेही ते घाणेरडे शब्द बोलतांना आवाज ‘म्युट’ करतात तर वृत्तपत्रेही ‘ते’ शब्द छापत नाहीत, कारण घराघरात असे घाणेरडे अपशब्द पोहचू नये, असे त्यांना वाटते. तर दुसरीकडे ‘शब्द परत घ्या, माफी मागा, हकालपट्टी करा,’ या मागण्यांसाठी विविध आंदोलने केल्या जातात. संधी मिळाली म्हणून आंदोलनातून एकजूट दाखविण्याचे कार्य होत असून या कामी खर्चही होत आहे. प्रसारमाध्यमे त्यात तेल ओतून टीआरपी घेण्याचे प्रयत्नात असतात, असे हे चित्र रोज झाले आहे.

राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी वापरलेल्या अपशब्दासाठी ‘खेद’ व्यक्त केला असला तरी राष्ट्रवादी कार्यकत्र्यांनी राज्यात निषेध, टायर जाळणे, त्यांच्या फोटोला जोडे मारणे, असे आंदोलन चालविले. दरम्यान नेत्यांच्या अपशब्दांची श्वेतपत्रिका काढण्याचे ना.सुधीरभाऊ मुनुंटीवर यांनी म्हटले आहे. वास्तविक राजकारणात नितीमत्ता, नैतिकता, आचार-विचारांची अशी सर्वच पातळी खालावत आहे. म्हणूनच गेल्या काही महिन्यात कुणी-कुणी किती अपशब्द वापरले, याचा अभ्यासही काही पत्रकारांनी सुरु केला आहे. राज्यात प्रथम क्रमांकावर शिवसेना नेते संजय राऊत नंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शेलार, अशी बरीचशी नावे समोर येत आहेत.

वास्तविक क्रोधात असणे, चीड-संताप व्यक्त करणे यासाठी शिव्यांचा वापर होतो. तर दुस-याला टोचून बोलणे, भावना दुखावणे, अवहेलना करणे यासाठी अपशब्दांचा आणि नको त्या आरोपांचा वापर होतो. मात्र हे सर्व कोण आणि कोणाबाबत व केव्हा? करतो आहे, हे जनता पाहता असते. तर असे केल्याने नेत्यांची प्रतिमा उजळत नाही. उलट ‘जसे नेते तसे कार्यकर्ते’ हा विचार केला तर तो प्रकार खाली झिरपतच येणार, त्यामुळे परिस्थिती अधिकच बिघडण्याची शक्यता असते. याचा सामना छोट्या कर्मचा-यांना, अधिका-यांना, कंत्राटदारांना व छोट्या कार्यकत्र्याना करावा लागतो. ते पण त्यांच्या खालील लोकांना शिव्या देतात. वास्तविक समाजाच्या समोर चांगले स्वप्न, भविष्य, देण्यासाठी नसले की राजकारणी शाब्दिक हिंसक भाषा वापरतात, असे मत भाषातज्ञांचे आहे.

शेवटी राजकारणाच्या सर्वच क्षेत्रावर प्रभाव पडतो, तेव्हा राजकारण्यांनी याचे भान ठेवले पाहिजे. शिव्याने शिवी वाढणार हे सुत्र समजून घेतांना ‘शिवराळ राजकारण’ थांबविण्यासाठी थोडा तरी सुसंस्कृतपणा दाखविला पाहिजे. अन्यथा हे सर्व वाढतच जाणार. यामुळे सज्जंनांची व महिलांची ‘कोंडी’ वाढतच जाणार. तसेही ज्यांच्या विषयी अपशब्द किंवा शिवी दिली तर त्यांच्या प्रतिमेत फरक पडत नाहीत, बोलणा-याचीच विव्द्त्ता दिसून येते. एवढे मात्र खरे.
‘शब्द’ कसे असावेत, किंवा शब्दाची महती काय? याबाबत खूप काही लिहिण्यात आलेले आहे. तर शब्दांचे सामर्थ्य सर्वमान्य आहे. शब्दांना शस्त्रही मानतात. मात्र जपून वापर करीत नाही, अनेक राजकारणी मर्यादा पाळत नाहीत, हे मानावेच लागेल.
शेवटी या ओळी आठवतात…

शब्द से खुशी, शब्द से गम।
शब्द से पीडा, शब्द ही मरहम।
सोचिए कैसा हैं शब्दों का दम!

       राजेश राजोरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here