योगा डे : योगाभ्यास एक उपचार
योग है स्वास्थ के लिए क्रांती,
नियमित योग से जीवन मे सुख शांती।
उद्या २१ जून म्हणजेच योग दिवस (योगा डे). जागतिक पातळीवर ‘योगा डे’ साजरा होण्याचे हे ९ वे वर्ष. भारताने जगाला ‘योग’ दिला. सर्वप्रथम सुमारे ५ हजार वर्षापूर्वी पतंजली ऋषींनी योग सांगितला. तर गेल्या ९ वर्षापूर्वी २१ जून २०१५ रोजी जागतिक पातळीवर पहिला ‘योगा डे’ साजरा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा व्हावा, असा प्रस्ताव २७ सप्टेंबर २०१४ रोजी दिला. तेव्हा १७७ देशांच्या मान्यतेने ११ डिसेंबर २०१४ रोजी याची घोषणा करण्यात आली. २१ जून हा सर्वात मोठा दिवस असतो. हा दिवस मानवाला दिर्घायू बनवितो आणि योगाभ्यासही मनुष्याला निरोगी ठेवण्यासाठी विचार, संयम, उर्जा प्रदान करून दिर्घायू होण्यास मदत करतो. म्हणूनच २१ जून हा दिवस ‘योगा डे’ म्हणून निवडण्यात आला.
जागतिक पातळीचा प्रथम ‘योगा डे’ २१ जून २०१५ रोजी दिल्ली येथील राजपथवर साजरा झाला. त्यावेळी ८४ देशांचे प्रतिनिधींसह एकूण ३५ हजार ९८५ साधकांनी केंद्र सरकारच्या ‘कॉमन योगा प्रोटोकॉल’ नुसार योगाभ्यास केला. याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड मध्ये झाली आहे. ‘योगा डे’ ची दरवर्षी वेगवेगळी ‘थीम’ असते. त्यानुसार २०२३ ला ‘वसुधैव कुटुम्बकम’ या सिध्दांतानुसार ‘वन वर्ल्ड वन हेल्थ’ अशी थीम आहे. यापूर्वी ‘हृदयासाठी योग, शांतीसाठी योग, घर पर और परिवार के साथ योग’. अशा वेगवेगळ्या ‘थीम’ राहिल्या आहेत. ‘योगा डे’ दिनी जनजागृतिसाठी योगाभ्यासकांनी ध्यान, सामुहिक मंथन, विचार-विमर्श आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून हा उत्सव साजरा करावा, अशी अपेक्षा असते. मात्र त्यापेक्षाही ‘योगा’ अंगीकारावा यासाठीची प्रतिज्ञा घेणे, खूप महत्वाचे ठरते, कारण बदलत्या जीवनशैलीत ‘योगा’ एक उपचार पध्दती म्हणूनही समोर येत आहे.
‘योगा’ भारतात खूप आधीपासून आहे. तसेच शेकडो संस्था योगाभ्यास शिकवितात, ध्यान-धारणा शिकवितात. यामध्ये योगगुरु बाबा रामदेव यांचे पतंजली योगचे कार्य तसेच नाशिक येथील योग विद्या गुरूकुलचे आचार्य विश्वासराव मंडलीक गुरूजी, तसेच जनार्दन स्वामी मठ, नागपूर, योगाचार्य सत्यानंद सरस्वती स्थापीत व निरंजनानंद सरस्वती व्दारा संचालीत बिहार स्कूल ऑफ योगा मुंगेर, डॉ.एच.आर.नागेंद्र यांचे स्वामी विवेकानंद योग अनुसंधान बंगलौर, स्वामी कुवलयानंद स्थापीत वैâवल्यधाम लोणावळा, श्रीकृष्ण व्यवहारे यांचे घंटाळी मित्र मंडळ ठाणे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकरजी, ब्रह्माकुमारीजची ध्यान पध्दती ‘राजयोग’, असे अनेक संस्थांचे प्रमुखकार्य आहे. तर अनेक विद्यापीठात योग शिकविला जातो. योगाची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम, संशोधन उपलब्ध आहेत. तरीही ‘योगा’ चा प्रचार व प्रसार आणखी होणे तसेच योग साधकांची संख्या वाढविणे हे वैयक्तिक व समाजहिताचे आहे.
‘योगा’ला आध्यात्मिकतेशी पण जोडलेले आहे. हे एक माध्यम असून वैâवल्यप्राप्ती हे अंतीम चरण आहे. तर त्याकडे जातांना अष्टांग योग, हट्ट योग, कुंडलिनीयोग, असे विविध प्रकार असले तरी योगाभ्यासव्दारे प्रकृती निरोगी सुदृढ राहणे, अनेक लहान सहान आजार बरे होणे, हे त्या मार्गातील फायदे असल्याचे योगतज्ञ सांगतात. ‘योगा’ हे कल्पवृक्ष सारखे आहे. जे पाहिजे ते मिळविता येते. अर्थात वजन कमी करणे किंवा वाढविणे, एकाग्रता राखणे, व्यसनांपासून मुक्ती, वैचारिक स्वास्थ्य, डोके आणि शरीराची एकाग्रता, उर्जा प्राप्ती, तर नैराश्य दूर करणे, मन संतुलीत ठेवणे, दृष्टीकोन बदलणे, आदी बाबी दैनंदिन योगाभ्यासातून साध्य केल्या जाऊ शकतात.
योगासने खूप प्रकारचे असले तरी केंद्र सरकारने तयार केलेला ‘कॉमन योगा प्रोटोकॉल’ हा योगाभ्यास सर्व वयातील व्यक्तिंना, मुली व महिलांना सहज करता येईल, असा योगाभ्यास असून यामध्ये एकूण २० आसने, १० प्रकारचे सुक्ष्म व्यायाम, शुध्दीक्रीया, प्राणायाम व ध्यान आहेत. सर्वांना अत्यंत उपयुक्त हा योगाभ्यास रोज किमान एक तास तरी करायला हवा.
‘योगधर्म’ हा ‘युगधर्म’ आहे. आत्म अनुशासनात योग सुरू होतो आणि आपण आत्मविजेता होतो, असे योगगुरु बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. तर रोग, विकारांपासून वाचून राहण्यासाठीचा उपाय म्हणून योगाभ्यास आहे, आणि जगात करोडो लोक याचा अनुभव घेत आहे. प्रत्येकाने कुटुंबात, समाजात सर्वांसाठी वेळ देत असतांना स्वतःसाठीही वेळ राखून योगाभ्यासासाठी दिला तर शरीर आणि मन उर्जावान राहील, कारण ‘योगा’ हे मनावर उपचार करते, एवढे मात्र खरे!
शेवटी ‘पहिला सुख निरोगी काया’ या उक्तीप्रमाणे चार ओळी आठवतात –
पैसे के पीछे दौड रहा मन है,
रोगों से पीडित सबका तन है,
योग को तुम अपनाओ क्योंकि,
स्वास्थ्य ही सबसे बडा धन है।
राजेश राजोरे
मो.नं. : ९८२२५९३९०३
rajeshrajore@gmail.com