मेहनत, जिद्द आणि शासनाची साथ…! खडकाळ माळरानावर फुललेल्या फळबागेचा शेतकऱ्याला हात

0
167

शेतकऱ्यांच्या जिद्दीला शासनाच्या योजनांची साथ मिळाली की कसे अमूलाग्र परिवर्तन होते हे यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा वाचून, पाहून लक्षात येते. अशाच यशस्वी शेतकऱ्यांपैकी एक असलेल्या गोपाळ गजानन कदम यांनी खडकाळ माळरानावर डाळींब, सिताफळाच्या दर्जेदार फळबागा आणि कारले, कांदा, घेवडा अशा पिकांचे शिवार फुलविले आहे….

पुरंदर तालुक्यातील सटलवाडी या दीड हजारच्या आसपास लोकसंख्या असलेल्या लहानशा गावातील शेतकरी गोपाळराव कदम हे वारकरी कुटुंबातील. 1986 सालचे पदवीधर असलेल्या गोपाळरावांनी नोकरीऐवजी शेतीची वाट निवडली. वास्तविक त्या काळात शासकीय नोकरीच्या संधी सहज उपलब्ध होत्या. त्यांनीच सांगितल्याप्रमाणे त्या काळी शिक्षकाला दीड ते दोन हजार रुपये तर बँकेतील चांगल्या पदावरील नोकरदारास 6 हजारापर्यंत वेतन होते. परंतु, त्यांच्याकडील काही शे- दोनशे मोसंबीच्या झाडांपासूनच त्यांना त्यापेक्षा अधिक रक्कमेचे उत्पन्न मिळत असल्यामुळे त्यांनी शेतीच करण्याचा निर्णय घेतला.

गोपाळराव यांची वडिलोपार्जित जमीनीपैकी काही जमीन बागायत होती. त्यामध्ये भाजीपाला, कडधान्ये, मोसंबी अशी पिके ते घेत. परंतु, डोंगराच्या जवळ असलेली 6.5 एकर जमीन पडीक खडकाळ, मुरमाड होती. हळूहळू ही जमीन त्यांनी विकसित करायला सुरुवात केली. पाण्याची खात्रीशीर सोय असल्याशिवाय शेती होऊ शकत नाही. म्हणून 1999- 2000 मध्ये विहीर खोदली. जवळपास 6 हजार फूट पीव्हीसी पाईपलाईन करुन नवीन विकसित केलेल्या शेतात पाणी आणले आणि पिकवायला सुरूवात केली. त्यावेळी बाजरी, ज्वारी, मटकी, हुलगा, कांदा थोड्या प्रमाणात हळद आदी पिके घेतली जात होती. काही डाळींबाची झाडे लावली.

विहिरीच्या पाण्यामुळे आठमाही शेतीच करता येत होती. मग सहा- सात शेतकऱ्यांचा समुह करुन राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून (एनएचएम) सामुहिक शेततळे घेण्याचा निर्णय घेतला. 3 लाख 25 हजार रुपये अनुदानातून 34 मीटर बाय 34 मीटर बाय 4.7 मीटर लांबी, रुंदी, उंचीचे आणि 50 लाख लिटर साठवण क्षमतेचे शेततळे तयार झाले. सर्व पिकांसाठी ठिबक सिंचन तंत्र वापरले जात असल्यामुळे 25 एकर शेतीला या शेततळ्याचे पाणी पुरते. त्यावेळी ठिबक सिंचन संचासाठीही 49 हजार रुपये अनुदानाचा लाभही मिळाला.

गरजेच्या कालावधीतील पाण्याची शाश्वत सोय झाल्यामुळे डाळींब आणि सिताफळ या फळबाग लागवडीवर विशेष भर दिला. 2016 च्या दरम्यान महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सिताफळ लागवडीसाठी 20 हजार रुपये अनुदान मंजूर झाले. त्यातून 225 सिताफळ झाडे लावली. पूर्वीची डाळींबाची झाडे जुनी झाल्यामुळे काढून टाकावी लागली. त्यानंतर पुन्हा 2017- 18 मध्ये 450 झाडे लावली. व परत 2021 मध्ये 150 झाडे लावली.

शेतीत जैविक पद्धतीचा जास्तीत जास्त अवलंब
फळबागा व भाजीपाला पिकांसाठी कदम जैविक पद्धतीचा अवलंब करतात. रासायनिक खते आणि कीडनाशके यांचे प्रमाण 20 टक्क्यांपर्यंत अत्यल्प ठेवले आहे. गाईचे शेण, मूत्र, गूळ, दाळीच्या पीठापासून केलेले जीवामृत फवारणे, नीम अर्कची फवारणी. कंपोस्ट तयार करण्यासाठी शेणखत, लेंडीखत, कोंबडखत, बोनमील, उसाची प्रेसमडचा शेतातच डेपो करुन त्यावर नत्र, स्फुरद, पालाश स्थिरीकरणासाठी पीएसबी, एनपीके जीवाणू सोडले जातात. ही खते प्रत्येक झाडाला देऊन कीड, बुरशी नियंत्रणासाठी जीवाणूयुक्त कीडनाशके, बुरशीनाशके वापरतात. अत्यल्प तीव्रतेचे बोर्डो मिश्रण, जैविक किटकनाशके घरीच तयार केले जाते. कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सल्ला यामध्ये वेळोवेळी मिळत असतो.

डाळींबाच्या साडेचारशे झाडांवर पहिल्या वर्षी प्रत्येक झाडाला 15 किलो माल मिळाला. पुण्याच्या गुलटेकडी फळबाजारात 80 ते 180 रुपये प्रतिकिलो दर मिळाला. 8 ते साडेआठ लाख रुपयांचे उत्पन्न त्यातून मिळाले. त्यानंतर आता या झाडांचा तिसरा बहार आणि नवीन लावलेल्या 150 झाडांचा पहिला बहार घेतला आहे. यावर्षी फळांचा आकार मोठा रहावा म्हणून प्रतिझाड फळांची संख्या नियंत्रणात ठेवली आहे.

एक एकर क्षेत्रामध्ये लागवड केलेल्या फुले पुरंदर या वाणाच्या सीताफळाच्या 225 झाडांपासून 5 व्या वर्षी 3 लाख 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. एका झाडावर खतासह एकूण सर्व खर्च 300 रुपयांपर्यंत तर उत्पन्न दीड ते पावणेदोन हजार रुपये मिळाले.

त्यांनी १ एकर क्षेत्रावर कारल्याचे पीक घेतले आहे. रोजच्या रोज सासवड आणि दिवे भाजीपाला मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवले जाते. त्यातूनही मोठा नफा होत आहे. त्यांचे भाऊ विक्री व्यवस्थापनाकडे लक्ष देत असल्यामुळे पीकाकडे लक्ष द्यायला वेळ मिळत असल्याचे गोपाळराव कदम सांगतात. यंदा कांद्याचे उत्पादनही चांगले असून 80 टनाहून अधिक होण्याची अपेक्षा आहे. 15 रुपयापेक्षा अधिक दर मिळाल्यास चांगला फायदा होईल, असे ते म्हणतात.

कदम यांना रोहयोतून फळबाग लागवड, ठिबक सिंचन संचासाठी अनुदान, एनएचएम मधून सामुहिक शेततळे या योजनांच्या लाभाबरोबरच कृषि उन्नती योजनेंतर्गत कृषि यांत्रिकीकरण उपअभियान मधून ट्रॅक्टरचालित औजारे खरेदी केली. रोटाव्हेटरसाठी ३५ हजार रुपये, पल्टीफाळ नांगरासाठी २३ हजार रुपये, 2016 मध्ये विद्युत पंपासाठी 10 हजार रुपये अनुदान मिळाले आहे.

शेतात केलेल्या विविध प्रयोगांमुळे त्यांना विविध पुरस्कारही मिळाले आहेत. शाश्वत उत्पन्नासाठी शेतीवरील खर्च मर्यादित व कमी करत उत्पन्न वाढवण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केल्यास तोट्यातील शेती नफ्यात बदलणे अजिबात कठीण नाही हे गोपाळराव कदम यांच्या उदाहरणातून दिसून येते.

चौकट
गोपाळराव कदम, शेतकरी- शेतीमध्ये सुशिक्षित वर्ग आला पाहिजे. शेती ही नियोजनबद्ध, नफा- तोट्याचा मेळ घालून आणि व्यावसायिकरित्या करण्याची बाब आहे. शिक्षण अर्धवट सोडलेला, कमी शिकलेला घटक यात मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे व्यावसायिकरित्या शेती केली जात नाही. शेतकरी शासनाच्या योजनांची माहिती आणि त्यांचा लाभ मिळवण्यात अपुरे पडतात. त्यामुळे शेती परवडत नाही. परंतु, सुशिक्षितांनी योग्य पद्धतीने शेती केल्यास नक्कीच चांगले उत्पादन आणि उत्पन्न शेतीतून मिळू शकते.

  • सचिन गाढवे,
    माहिती अधिकारी,
    जिल्हा माहिती कार्यालय, पुणे
    000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here