मुद्रणालय चालकांनी लोकप्रतिनिधीत्व अधिनियमातील तदतुदींचे पालन करावे- डॉ.सुहास दिवसे

0
103

मुद्रणालय चालकांनी लोकप्रतिनिधीत्व अधिनियमातील तदतुदींचे पालन करावे- डॉ.सुहास दिवसे

पुणे, दि. १८: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मुद्रणालय चालकांनी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ मधील तरतुदींचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती कदम, पूना प्रेस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राहूल मारुलकर, सदस्य रवींद्र जोशी आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, निवडणुकीदरम्यान उपयोगात आणले जाणारे हस्तपत्र, हस्तपुस्तिका, भित्तीपत्रके आदी छापिल प्रचारसाहित्याच्या छपाईसंदर्भात लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १२७ए नुसार तरतुदींचे पालन होणे आवश्यक आहे. त्यानुसार निवडणूक प्रचारसाहित्यावर मुद्रक आणि प्रकाशकाचे नाव व पत्ता असणे बंधनकारक आहे.

प्रकाशकाने ओळखीचा पुरावा म्हणून ओळखणाऱ्या दोन व्यक्तींनी साक्षांकित केलेले स्वस्वाक्षरीत प्रतिज्ञापत्र दोन प्रतीत मुद्रकाकडे सादर करणे आवश्यक आहे. मुद्रकाने छपाईनंतर प्रतिज्ञापत्र आणि प्रचारसाहित्याची एक प्रत तात्काळ जिल्हाधिकारी यांना पाठविणे आवश्यक आहे.

या कलमाचा भंग झाल्यास सहा महिन्यापर्यंतचा तुरुंगवास किंवा दोन हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे. तरी जिल्ह्यातील सर्व मुद्रणालय चालकांनी लोकप्रतिनिधीत्व अधिनियमाचे पालन करुन वेळोवेळी माहिती सादर करावी. मुद्रणालय संघटनेनेदेखील आपल्या सर्व सदस्यांना या तरतुदीची माहिती द्यावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी बैठकीदरम्यान केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here