चळवळ,चळवळ आणि चळवळ.
मी त्याला म्हणलं
आता चळवळीत या
चळवळीचं काम हातात घ्या
तो म्हणाला
आता शिक्षण सुरू आहे
तुम्ही नंतर या…
त्याच शिक्षण झालं
मी पुन्हा त्याच्याकडे गेलो
म्हणलं आता चळवळीत या
तो म्हणाला
आता कुठं शिक्षण पूर्ण झालं
नोकरीच्या शोधात आहे
तुम्ही नंतर या…
तो नोकरीला लागला
मी परत त्याच्याकडे गेलो
मी पुन्हा म्हणलं
चला आता चळवळीत या
तो म्हणाला
आता कुठं नोकरी लागली
लग्न करावं म्हणतोय
तुम्ही इतकं फिरत असता
जरा तुम्हीच मदत करा
एखादी चांगली श्रीमंत मुलगी शोधून द्या…
त्याच लग्न झालं
त्याला मुलं झाली
मुलं मोठी झाली
त्यांची लग्न होऊन
त्याला नातवंडं झाली
गाडी आली
बंगला झाला
मी त्याच्या बंगल्यात गेलो
त्याला चळवळीत या म्हणणार तोच
त्याने हॉल मध्ये सर्वांना बोलावलं
त्याची मुलं
त्याची बायको
त्याच्या सुना
आणि त्यांची नातवंडं
सगळे हजर झाले
आणि त्याने
“चळवळीसाठी
झिजलेला एक कार्यकर्ता” म्हणून
माझी ओळख करून दिली
इतकंच नाही
तर एक शाल पांघरून
त्याने माझा सत्कार ही केला
मी माझ्या घरी आलो
शाल गुंडाळून फेकून दिली
दार लावून घेतलं
बाबासाहेबांचा फोटो
छातीशी आवळून घट्ट धरला
आणि हंबरडा फोडत ओरडलो
जय भिम
जय भिम
जय भिम….
दंगलकार नितीन चंदनशिवे
कवठेमहांकाळ
जि.सांगली
7020909521 (संपर्क साधू शकता)