आयपीएस डॉ. सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन – महाराष्ट्र पोलीस दलात शोककळा
मुंबई – मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी डॉ. सुधाकर पठारे आणि त्यांचे मित्र भागवत खडके यांचे तेलंगणातील भीषण अपघातात निधन झाले. शनिवारी दुपारी श्रीशैलमहून नागर कुरनोलकडे जात असताना त्यांच्या कारला घाट रस्त्यावर बसने जोरदार धडक दिली. या अपघातात पठारे आणि खडके गंभीर जखमी झाले आणि त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
अपघातात डॉ. सुधाकर पठारे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर भागवत खडके यांच्या पायाला आणि शरीराच्या अंतर्गत भागात गंभीर मार लागला. या दुर्घटनेची माहिती तेलंगणा पोलिसांनी मुंबई पोलिसांना दिली आहे.
डॉ. सुधाकर पठारे हे 2011 बॅचचे आयपीएस अधिकारी होते आणि सध्या मुंबई पोलीस आयुक्तालयात पोर्ट झोनचे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांनी आपल्या सेवाकाळात महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये उल्लेखनीय कार्य केले. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर 1995 साली ते जिल्हा विशेष लेखा परीक्षक झाले. त्यानंतर 1996 मध्ये विक्रीकर अधिकारी (वर्ग 1) आणि 1998 मध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यांनी पंढरपूर, अकलूज, कोल्हापूर शहर आणि राजुरा येथे पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यभार सांभाळला होता.
डॉ. सुधाकर पठारे यांच्या आकस्मिक निधनामुळे महाराष्ट्र पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या कर्तृत्ववान कारकिर्दीला पोलिस दलात नेहमीच मानाचे स्थान असेल.
साप्ताहिक भावनगरी परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली
