“मराठीचा अभिमान आणि भविष्यासाठी संकल्प”

0
41

सह्याद्रीचा कडा मराठी..
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते , मराठी भाषेचे अग्रगण्य कवी ( जन्म २७.२.१२- १०.५.९९ )
कविवर्य कुसुमाग्रज यांचे साहित्यिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय असल्यानं शासनानं
२७/२ हा कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जावा असा कौतुकास्पद निर्णय घेतला.
आज कित्येक प्रयत्नानंतर संघर्षानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला.
“उज्ज्वल त्याची पहा प्रभावळ
दूर मनो-यात
अन् लावा ऋदयात सख्यांनो
आशेची वात”…
( विशाखा)
ओठात आणि पोटात घेऊन फिरणारी मायमराठी बोली लाखो साहित्यिकांच्या माध्यमातून समृद्ध झाली आहे.होत आहे.मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी आपण मिळून जो लढा दिला त्याचं कुठ़ंतरी चिज झालं म्हणायला हरकत नाही .
मराठी ही प्राचीन काळापासून चालत आलेली सहज सोपी अशी भाषा आहे.हे कोणी नाकारू शकत नाही.
तिचा ही एक दरारा आहे.तिची ही एक वेगळी ओळख आहे.सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीची आमची मराठी भाषा आम्हाला प्रिय आहे.
डॉ पठारे समितीनं मराठी भाषा ही अभिजात भाषेचा दर्जा कशी आहे याचे पुरावे, ते सर्व निकष केंद्र सरकारला दिले तेव्हा कुठं तो दर्जा मिळाला.गोष्ट कौतुकास्पद आहे.
साहित्य, समाज ,सांस्कृतीक इ.क्षेत्रांच्या माध्यमातून हा लढा देणं खूप आणि खरंच गरजेचं होतं.
अभिमानानं सांगावसं वाटतं की आज आठ ते नऊ कोटी लोकसंख्येच्या माध्यमातून मराठी भाषा बोलली जाते.ती महाराष्ट्रा पुरतीच फक्त मर्यादित तर मुळीच नाही.
मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा जरी असली तरी ती इतरही राज्यात बोलली जाते.मग का नसावा अभिमान आम्हाला माय मराठीचा? महाराष्ट्राला समृद्ध असा साहित्य ,सांस्कृतिक अशा कलेचा वारसा लाभलेला आहे. प्राचीन आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या माय मराठीला आपण आणखीन समृद्ध करण्यासाठी चला तर कटिबद्ध होऊया! एकजूट होऊ या!
दिवाळी जवळ आली की घरातील जपून ठेवलेले दिवे स्वच्छ केले जातात. जे आपल्या जीवनातला अंधकार संपवतात. पुन्हा नव्यानं सजतात. तेजाळतात. लख्ख लख्ख पेटतात .वर्षातून एकदा त्यांना स्वच्छ धुतले जातात. घासले जातात. काम झाले की पुन्हा ठेवून दिले जातात. असंच काहीसं मराठी भाषेबद्दल झालेलं दिसतय. कारण मराठी भाषा गौरव दिन जवळ आला की सगळेजण मराठी बोलतात, जपतात ,साहित्यावरचे प्रेम दाखवतात. हे असं खरंच नको व्हायला.


मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी आपण एकजूट होऊन झटायला हवे. आपल्या मराठी भाषेची होत चाललेली घसरण आपण उचलून धरली पाहिजे. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असायला हवं याला खूप महत्त्व दिलं जातं.गोष्ट वाईट नाही मुळी .इंग्रजी यायला हवं पण यासाठी मराठीला थोडं दूर लोटलं जात आहे. ही खंत काळजात सलते आहे. आज मराठीचे कितीतरी असे शब्द आहेत की ते आता लोप पावत चालले आहेत. मराठी संवादाच्या प्रत्येक वाक्यांमध्ये इंग्रजी, हिंदी असे कितीतरी शब्द वापरले जातात. मग भीती वाटते की अशीच हळूहळू मराठी भाषा ही -हास पावत गेली तर …!प्रत्येकाला प्रत्येक भाषा यायला हवी, पण या हट्टा पायी आपण आपली राज्यभाषा विसरून चाललो आहोत.
अनेक शाळांमधून ,शिक्षणात मराठीचा वापर वाढवणं तो जोपासणं तसेच मराठी भाषेचा वापर प्रत्येक ज्ञान निर्मितीच्या कामात, रोजच्या व्यवहारात तत्त्वज्ञान ,कला साहित्यात तो १००% केला पाहिजे हाच खरा मराठी भाषा गौरव दिन म्हणून खऱ्या अर्थानं ओळखता येईल. मराठी भाषेचा प्रसार प्रचार करणं आज काळाची गरज बनू पाहत आहे.
मराठी भाषेमध्ये रसाळपणा मधाळपणा तर आहेच पण सहजता ,सात्विकता ही पुरेपूर भरलेली आहे. मराठीचे वैभव टिकण्यासाठी छत्रपती शिवाजी राजांपासून आजपर्यंतच्या अनेक साहित्यकांनी संतांनी कसोशीने प्रयत्न तर केले आहेतच, तरीही मराठी भाषा ही सातासमुद्रा पार कशी नेता येईल? याचा विचार होणं आज गरजेचं वाटतं. मराठी भाषा ही ज्ञानभाषा आहे तिच्यातली गोडवी प्राचीन काळापासून आपण चाखत आलेलो आहोतच. म्हणूनच वाटतं की पुढील पिढीनंही या भाषेसाठी ,भाषेच्या संवर्धनासाठी झटावं.
मराठी भाषेचा विकास आणि महाराष्ट्राचा साहित्य आणि सांस्कृतिक कलेचा वारसा जपण्यासाठी आपण रान पेटवून उठलं पाहिजे.
“अभिमानानं गर्जतो मराठी
लाभले आम्हास भाग्य
बोलतो मराठी
जगा मराठी
बोला मराठी
जपा मराठी”
लेखाच्या शेवटाकडं वळताना माझ्या काही कवितेच्या ओळी इथं मांडते.
आमची माय मराठी
दुधावरची साय मराठी !
गाताच पोवाडे वीर शिवबांचे.
रक्त सळसळे वीर मराठ्यांचे
सह्याद्रीचा कडा मराठी
शिवनेरीचा बुरुज मराठी !
माझा मराठीची बोलू कौतुके
अमृतातेही पैजा जिंके
आमची शान मराठी
आमचा मान मराठी!
©️®️🖋️ अंजली राठोड श्रीवास्तव करमाळा.७७०९४६४६५३.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here