मतदान प्रक्रिया पार पाडणे सामूहिक जबाबदारी-अपर जिल्हाधिकारी प्रतिभा इंगळे

0
17

मतदान प्रक्रिया पार पाडणे सामूहिक जबाबदारी-अपर जिल्हाधिकारी प्रतिभा इंगळे

पुणे,दि.१२:- मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडणे ही मतदान केंद्राध्यक्ष किंवा मतदान अधिकाऱ्याची जबाबदारी नसून मतदान केंद्रावर नेमलेल्या सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे असे प्रतिपादन जिल्हा निवडणूक प्रशिक्षण समन्वय अधिकारी तथा अपरजिल्हाधिकारी प्रतिभा इंगळे यांनी केले.

विधानसभा निवडणूकीच्यात अनुषंगाने चिंचवड विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतर्गत मतदान केंद्रांवर नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षणात उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आशा होळकर, किशोर ननवरे, कर्मचारी व्यवस्थापन समन्वय अधिकारी किरणकुमार मोरे, मतपत्रिका छपाई समन्वय अधिकारी श्वेता अल्हाट यांच्यासह संबंधित समन्वय अधिकारी तसेच मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

श्रीमती इंगळे म्हणाल्या, प्रशिक्षणात सहभागी झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक बाबीची माहिती सविस्तररित्या समजून घ्यावी. त्यामुळे आत्मविश्वासाने जबाबदारी पार पाडता येते. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे अशी सूचना त्यांनी केली.

निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार म्हणाले, मतदान प्रक्रिया ही संपुर्ण निवडणूक प्रक्रियेतील महत्वाचा टप्पा आहे. मतदान प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाच्या नियमांचे आणि मार्गदर्शक सुचनांचे तंतोतत पालन करुन पारदर्शक आणि शिस्तबद्ध, शांततापूर्ण वातावरणात तसेच विहीत वेळेत पार पाडण्यासाठी सर्व नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडावी. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. कामात एकसूत्रीपणा येण्यासाठी सर्व नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी योग्यरित्या प्रशिक्षण घेणे आवश्यक असून निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यांचे बारकावे समजून घेणे गरजेचे आहे. ईव्हीएम, व्हीव्हीपॅट आदी यंत्रणांबाबत सविस्तर माहिती घेऊन तसेच निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या सर्व साहित्याचे वाचन करून प्रत्येक बाबीची सूक्ष्म माहिती घेऊन मतदान प्रक्रियेसाठी सर्वांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आशा होळकर यांनी यावेळी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेची माहिती तसेच नियुक्त कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य पार पाडण्याबाबत मार्गदर्शन केले. मतदानाचे संपुर्ण कामकाज इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे होणार असल्याने कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट आदी साहित्यांची सविस्तर माहिती घेऊन हाताळणी करावी तसेच ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी याआधी निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला नसेल किंवा त्यांची पहिलीच वेळ असेल अशांनी अनुभवी सहकाऱ्यांची मदत घ्यावी आणि प्रत्येक प्रशिक्षणास उपस्थित रहावे असे सांगितले.

दोन सत्रात पार पडलेल्या या प्रशिक्षणामध्ये प्रथम सत्रात थेरगाव येथील स्व.शंकर अण्णा गावडे स्मृती कामगार भवन येथे संगणकीय सादरीकरणाद्वारे मतदान प्रक्रियेचे सविस्तर प्रशिक्षण अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आले. तर द्वितीय सत्रात थेरगाव येथील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात प्रात्यक्षिकाद्वारे ईव्हीएम हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात आले.
०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here