बालगृहातील मुलगा कॅनॉलमध्ये बुडून मृत्यूमुखी
बारामती, दि. २० फेब्रुवारी २०२५ – बारामती येथील चर्चेस ऑफ क्राईस्ट बॉईज होम या बालगृहातील एक मुलगा कॅनॉलमध्ये बुडून मृत्यूमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
दि. १८ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ४.३० वाजता, बालगृहात २०१८ पासून दाखल असलेला राजवीर वीरधवल शिंदे (वय १५ वर्षे) हा त्याचे दोन मित्र अर्जुन वाघारी आणि मोईन अमीर शेख यांच्यासह नटराज पार्क येथे फिरायला गेला. तेथून तिघेही आंघोळीसाठी कॅनॉलमध्ये उतरले. मात्र, राजवीरला पोहता न आल्याने तो पाण्यात बुडून वाहून गेला.
या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने शोधकार्य सुरू केले. अखेर, दि. २० फेब्रुवारी रोजी बांदलवाडी येथे कॅनॉलमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला.
बालगृह अधीक्षक रॉबर्ट वसंतराव गायकवाड यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
- प्रतिनिधी
