बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या सदस्यांची पेडल फॉर ग्लोरिअस हिस्ट्रीची मोहीम क्रमांक – ०७ फत्ते
बारामती-किल्ले अजिंक्यतारा-बारामती अशी २०० किमी एकदिवसीय सायकल राईड संपन्न
ता.१६ (प्रतिनिधी): बारामती मध्ये क्रीडा संस्कृतीच्या विकासाठी कार्यरत असणाऱ्या , बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या सदस्यांनी पेडल फॉर ग्लोरिअस हिस्ट्रीची मोहीम क्रमांक – ०७ अंतर्गत , बारामती-किल्ले अजिंक्यतारा-बारामती अशी २०० किमी एकदिवसीय सायकल राईड संपन्न केली . शिवजयंती , महात्मा फुले जयंती आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी या सायकल राईड चे आयोजन करण्यात आले होते.
लहान मुले , महिला , तरुण आणि जेष्ठ नागरिक अश्या एकूण ७० सायकल रायडर्स आणि बॅकअप स्टाफ सदस्यांनी ही सायकल राईड तसेच , गिरी पर्यटन मोहीम पूर्ण केली . सायकल राईड द्वारे किल्ल्यावर जाऊन , किल्ल्याचा इतिहास समजून घेणे तसेच , सुदृढ तथा शिवविचारांनी भारलेली नागरिकांची फौज निर्माण करणे ही पेडल फॉर ग्लोरिअस हिस्ट्री या मोहिमेची मध्यवर्ती संकल्पना आहे .
बारामती मधून , पहाटे ४:०० वाजता सामाजिक कार्यकर्ते प्रशांत नाना सातव आणि अन्य मान्यवरांच्या शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून छ. शिवाजी उद्यान , कसबा येथून राईडला प्रारंभ झाला . बारामती – फलटण – लोणंद – फौजी ढाबा – किल्ले अजिंक्यतारा असा मार्ग होता . सातारा येथे जलमंदिर पॅलेस येथे छत्रपती उदयनराजे भोसले यांची फाऊंडेशनच्या सदस्यांनी भेट घेऊन मोहिमेची माहिती दिली . सायकल राईड द्वारे गडकिल्ले सर करणे ही अभिनव संकल्पना पाहून , मा.खा.उदयनराजे प्रभावित झाले .
सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ आणि बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनचे विश्वस्त डॉ.हेमंत मगर यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ले अजिंक्यतारा सायकल राईड चे सर्व नियोजन करण्यात आले.
क्रीडा शिक्षक अजिंक्य साळी सर यांनी किल्ले अजिंक्यतारा चा इतिहास सदस्यांना उलगडून दाखवला. छ.शिवरायांचा दीर्घ सहवास लाभलेल्या या किल्ल्याचा इतिहास जाणून घेताना सदस्य भारावले होते.
राईड दरम्यान सदस्यांच्या अल्पोपहाराची व्यवस्था श्री.जयेंद्र चव्हाण यांच्याद्वारे करण्यात आली . तर , भोजन व्यवस्थेसाठी CA व्ही.एस.जाधव साहेब यांचे सहकार्य लाभले.
वैष्णवी ग्राफिक्स , बारामती येथे सहभागी सदस्यांना मोहिमे मधील सहभागाबद्दल मेडल आणि प्रशस्तीपत्रक देऊन उद्योजक सुरेशशेठ परकाळे , सामाजिक कार्यकर्ते प्रशांत नानाजी सातव , रवींद्र थोरात , राहुल जगताप मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
” सुदृढ आणि शिवछत्रपतीं च्या विचारांची ही चळवळ अशीच कायम राहणार असून , दिवसेंदिवस सदस्यांची वाढणारी संख्या आणि नागरिकांचा उस्फुर्त पाठिंबा हा पेडल फॉर ग्लोरिअस हिस्ट्री ही चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे. लवकरच पुढील मोहिमेची घोषणा केली जाईल . ” अशी माहिती बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनचे विश्वस्त डॉ.हेमंत मगर यांनी दिली .