बारामती वाहतूक पोलिसांनी घातला थेट मुळावरच घाव…!

0
48

बारामती वाहतूक पोलिसांनी घातला थेट मुळावरच घाव

फटाका सायलेंसर विक्री करणाऱ्या दुकानांमधूनच १६ सायलेन्सर जप्त

आज दुकानदारांकडून १६ वाहन चालकांकडून ११, महिनाभराचे मोहिमेत २४ असे एकूण ५१ सायलेन्सर जप्त..

बारामती दि. १९

   बारामती वाहतूक पोलिसांनी आता फटाका बुलेटवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. असे असतानाच आता वाहतूक शाखेने फटाका सायलेंसर विक्री करणाऱ्या दुकानांवरच कारवाई करत तब्बल १६ फटाका सायलेंसर ताब्यात घेत थेट मुळावरच घाव घातला आहे. त्यामुळे सायलेंसर विक्री करणाऱ्या दुकान चालकांनी मोठा धसका घेतला आहे.
    वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी गेली अनेक महिन्यांपासून वाहतूक नियमांची अंमलबजावणी करताना अनेक कारवाया करत लाखो रुपयांचा दंड वसुल केला आहे. बारामती वाहतूक पोलिसांनी महिनाभरापासून मोठ्या आवाजाच्या सायलेंसरवर कारवाईचा धडाका लावला आहे. मागील काही दिवसांपूर्वीही पोलीस निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली १२ बुलेटच्या फटाका सायलेंसरवर कारवाई करण्यात आली होती. मात्र तरीही काही विक्रेत्यांनी मोठ्या आवाजाच्या सायलेंसरची विक्री सुरूच ठेवली होती. काही दुकानांमधून बुलेट चालक हे फटाका सायलेंसर बसवून घेतात अशी माहिती पोलीस निरीक्षक यादव यांना मिळाली होती. याअनुषंगाने पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह  बारामती शहरातील मोठ्या आवाजाचे सायलेन्सर विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये तपासणी केली. या तपासणीत तब्बल १६ सायलेंसर जप्त करण्यात आले.त्यामध्ये बाइकर्स स्पेअर पार्ट ऑटोमोबाईल्स, महालक्ष्मी ऑटोमोबाईल्स, महावीर ऑटोमोबाईल्स या तीन दुकानांमध्ये मोठ्या आवाजाचे सायलेन्सर मिळून आले. बुलेट फटाका सायलेंसरवर कारवाईची मोहीम सुरू केल्यापासून आजतागायत ऐकून ५१ सायलेंसर जप्त करण्यात आले आहेत. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, वाहतूक पोलीस जवान सुभाष काळे, प्रदीप काळे, अजिंक्य कदम, प्रज्योत चव्हाण, सीमा घुले, स्वाती काजळे, रेशमा काळे, रूपाली जमदाडे, माया निगडे, सीमा साबळे आदींनी केली आहे.

एकाच दिवसात ११ मोठ्या सायलेंसरवर कारवाई

फटाका सायलेंसरवर कारवाई करण्याची मोहीम सुरु असताना आज दि. १८ रोजी एका दिवसात कसबा, भिगवण चौक, नेवसे रोड, इंदापूर चौक परिसरात ११ बुलेट चालकांकडून मोठ्या आवाजाचे सायलेंसर जप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे बुलेट गाड्या वापरणाऱ्या चालकांना आता सायलेंट सायलेंसर वापरावे लागणार आहेत.

यापुढेही अविरतपणे होणार कारवाई

बारामती शहरात वाहतुकीच्या नियमांचे सर्वांनी पालन करावे. शांतता सुव्यवस्था पाळण्यासाठी ही कारवाई यापुढे अशीच अविरत सुरू राहणार आहे.असे फटाका सायलेंसर विक्री करणाऱ्या दुकानदारांना सूचना केल्या असून यापुढे विक्री सुरू ठेवल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी ९९२३६३०६५२ या क्रमांकावर माहिती द्यावी.
-चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here